
तळोदा/सोमावल | ता.प्र./वार्ताहर TALODA
एकाच रात्रीतून चोरट्यांनी (thieves) तळोदा शहरातील कॉलेज रस्त्यावरील पाच दुकाने चोरट्यानी फोडून (Five shops were broken) अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यानी मोठे आव्हान उभे केले आहे. चोरटयांना फारसे हाती लागलेले नसले तरी एका किराणा दुकानातून (grocery store) २४ हजार रुपये लंपास केले आहेत. दरम्यान, दोन चोरटे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत.
तळोदा शहरातील कॉलेज रस्त्यावरील चिराग प्रोव्हिजन, नटराज प्रोव्हीजन, जय किसान ऍग्रो, कृष्णा सबमर्सीबल व एक रिकामे निनावी अशा पाच दुकानांचे चोरट्यांनी पुढील शटरचे कुलूप तोडले.
काही दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश करून थेट दुकानांच्या गल्लयाची झाडाझडती चोरटयांनी घेतली. तथापि चोरटयांच्या हाती मोठे घबाड लागले नाही. केवळ एका किराणा दुकानातील गल्ल्यातील २४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
दोन्ही किराणा दुकानातील समानदेखील चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेले होते. हे व्यावसायिक शनिवारी सकाळी दुकान उघडण्यास गेले असता दुकानाचे शटर उघडे असल्याचे त्यांना दिसून आले.
काही व्यापार्यांनी माल विक्रीतून आलेली रक्कम आपल्याबरोबरच घरी नेल्याने मोठी रक्कम चोरीपासून वाचल्याचे सांगण्यात आले. चोरीचा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी दुकानांची पाहणी करून चोरीची माहिती घेतली. पोलिसांनी चोरींच्या पंचनामा करून चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमीत कुमार बागुल हे करीत आहे.
तथापि एकाच रात्रीतून तब्बल पाच दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. शिवाय व्यापार्यांमध्येदेखील प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक वाढविण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे.
याशिवाय शहरातील प्रलंबीत असलेल्या सीसीटीव्हीं कॅमेर्याचा प्रश्न जिल्हा पोलीस प्रशासनाने कायमचा मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापार्यांकडून देण्यात आला आहे.
दोघे चोरटे कॅमेर्यात कैद
रात्री जवळपास सव्वा तीनच्या सुमारास भर पावसात चोरटे तोंडावर रुमाल बांधून जय किसान ऍग्रो या दुकानात शिरण्यासाठी दुकानांचे शटर वाकविले. तद्नंतर दोघांमधून एकाने दुकानाच्या आत प्रवेश केला. दुकानाच्या आत जावून दुकानाच्या गल्लयाची तपासणी करतांना सिसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. हे फुटेज पोलिसांना तपासात दिशादर्शक ठरणार आहेत.
जिल्हा स्तरावरून विविध पथक दाखल
एकाच रात्रीतून तब्बल पाच दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केल्यानंतर येथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हा विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर, नंदुरबार येथून ठसे पथक व डॉग स्न्वॉड मागविण्यात आले होते.ठसे पथकातील फौजदार प्रकाश भाबड, पोलीस नायक संजय रामोळे, पोकॉ चेतन चौधरी यांनी चोरट्यांचे हाताचे ठसे घेतले. तर डॉग स्न्वॉडमधील श्वानाने दुकानामधील चोरट्यांचा मागोवा घेत तेथून पुढे पन्नास फुटा गेल्यानंतर मागे घुटमळले होते. या श्वानपथकात फौजदार डांगरे, पोहेकॉ भिमसिंग गावीत, विनोद भील होते.नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल गोसावी, विशाल नागरे, बापू बागुल, सुनील पाडवी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिसांच्या इतर यंत्रणांनी एकाचवेळी भेट देवून चोरीच्या घटनेची माहिती जाणून घेतली. तपासाबाबत व्यापार्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, अल्पेश जैन, प्रसाद सोनार, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी, शाम भाऊ राजपूत, शिवसेनेचे गौतमचंद जैन, प्रविण जैन, मनोज भामरे, सुभाष जैन,नगरसेवक हिंतेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप परदेशी, गुंडू जैन, दिपक सुर्यवंशी, संजय माळी, जिवन माळी आदी सह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.