तळोदा येथे गादी भांडारास आग, दीड लाखांचे नुकसान

आग विझवितांना तीन कर्मचारी जखमी
तळोदा येथे गादी भांडारास आग, दीड लाखांचे नुकसान

तळोदा Taloda/मोदलपाडा । ता.प्र./वार्ताहर

तळोदा येथील वळण रस्त्यावरील गंगाई नगरमधील एका गादी भंडारास (Gadi Bhandara) शॉर्ट सर्किटने आग (Fire) लागून संपूर्ण गोदामच जळून खाक झालेे. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर तब्बल तासाभराने आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत साधारण दीड लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग विझवतांना अग्निशमन दलाच्या (Fire brigade) पाण्याचा जोरदार फवारा तिघांच्या डोळ्यात गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत.

तळोदा येथील इमरान लुकमान मणियार यांचे वळण रस्त्यानजीक गंगाई नगरमध्ये गादी भंडार आहे. त्यांनी कापूस पिंजण्यासाठीची तीन यंत्रे बसविली आहेत. तेथे गाद्या, उशी, रजइ बनवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी अचानक शॉक सर्किट होवून ठिणगी गाद्यांवर पडली. त्यामुळे आग लागली. पाहता पाहता गाद्यांनी मोठा पेट घेतला. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर या आगीचे तब्बल तासाभरापर्यंत तांडव चालले होते. आगीची ही घटना कर्णोपकर्णी शहरात पोहचल्यानंतर आग विझविण्यासाठी तळोदा पालिकेच्या अग्निशमन बंबाबरोबरच नंदुरबारच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे आग आटोक्यात आली.

आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड बाहेर ओढून काढण्यात आले. शेजारी असलेले मोईमखा मुजीबखा पठाण यांच्या राहत्या घरालादेखील आग लागली. आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

आग विझवण्यासाठी प्रभाग 2 चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, कल्लु अंसारी, सुभाष चौधरी, प्रदीप शेंडे, दीपक चौधरी, जगदीश परदेशी, मतीन शेख, बबलू बागवान, नुरू कुरेशी, आदिल शेख, गुडुर मणियार, फैजान मूनसी, अयाज पठाण, साहिल शेख, सोनू सय्यद, कमलेश पाडवी, नदीम पिंजारी, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, अमनुदिन शेख,अकबर हिदायात, नदीम बागवान, योगेश पाडवी, राजू पाडवी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत केली.

गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सहायक पो.नि अमितकुमार बागुल व अविनाश केदार यांनी परिश्रम घेतले.

यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या आगीत संबंधित दुकान मालकाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार गिरीश वखारे, तलाठी बळीराम चाटे, नायब तहसीलदार एस. पी.गवते, मंडळ अधिकारी एस.बी.पाटील, तलाठी राजेश पवार, तलाठी प्रदीप वसावे नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, योगेश मराठे, प्रदीप शेंडे, रामा ठाकरे, आनंद सोनार, जगदीश परदेशी, कमलेश पाडवी, नदीम बागवान, महेंद्र पोटे, नितीन मराठे आदी उपस्थित होते. घटनेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल, घटनेवर लक्ष ठेवून होते.

तीन जण जखमी

आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फवार्‍याने सिराज सय्यद, नाजीम शेख या दोघांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. एकाच्या डोळ्यातून तर रक्तही वाहत होते. याशिवाय शेरखान पठाण यास आग विझवतांना गोदामाचा पत्रा मांडीला लागून ते जबर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या आगीच्या घटनेची तहसीलदार गिरीश वखारे यांनी दखल घेऊन आपल्या महसूल कर्मचार्‍यांना पंचनामा करण्याची सूचना दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com