औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करा - अ‍ॅड.के.सी.पाडवी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करा - अ‍ॅड.के.सी.पाडवी

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

बदलत्या काळाची गरज ओळखून युवकांना रोजगार देणारे अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सुरू करावेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.पाडवी म्हणाले, नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजचे आहे.

त्यासाठी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम आणि प्रक्रीया उद्योगाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी भगर प्रक्रीया उद्योग उपयोगात येऊ शकेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी वितरण करण्यात येणार असल्याने वार्षिक योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील.

अधिक भाविक येणार्‍या यात्रा आणि तिर्थस्थळाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे. आवश्यक तेथेच व्यायमशाळा साहित्य देण्यात यावे.

वीज प्रवाह खंडीत होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचे प्रकार कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

नवापूर येथे 132 केव्ही उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. ग्रामीण भागात जलपुर्नभरण आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत मोलगी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत व्यावसायिक व समुदाय प्रशिक्षण केंद्राची जागा, शेतकर्‍यांसाठी छोट्या सिंचन योजना राबविणे, वैद्यकीय महाविद्यालयास निधी उपलब्ध करून देणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेने वेळेवर निधी खर्च करावा व विकासकामांना गती द्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com