वीजबिले टांगली रस्त्यावर

काठी येथील ग्राहकांमध्ये असंतोष
वीजबिले टांगली रस्त्यावर

मोलगी | वार्ताहर MOLAGI

सुरळीत वीज पुरवठा करण्यासह वीज शुल्काची बिले ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही वीज वितरणाची आहे. परंतु काठी ता.अक्कलकुवा (Akkalkuwa) भागातील ग्राहकांची चालू महिन्याची वीजबिले रस्त्यावर टांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न (MSEDCL) महावितरणकडून करण्यात आला आहे.

चुकीची वीजबिले, खंडीत वीज पुरवठा यासह वीज वितरणच्या काही सेवेबद्दल ग्राहकांमध्ये नेहमीच ओरड असते. असे असतानाच काठी ता.अक्कलकुवा भागातील ग्राहकांना वीज वापराच्या शुल्कापोटी काढलेली बिले काठी येथील गॅरेजसमोर रस्त्यावर एकाच ठिकाणी टांगण्यात आली आहेत.

सदर बिले ही चालू महिन्याची आहेत. थकबाकीने वीज पुरवठा खंडीत होणे व विलंब शुल्क टाळण्यासाठी ही बिले तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना बिले बेवारस सोडून संबंधित विभागाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्राहकांमधील नाराजी संतापात बदलली आहे.

वीज वितरणाच्या अशा या कारनाम्यांमुळेच ग्राहकांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारणांवरुन मागे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस संबंधित अधिकार्‍यांनी ग्राहकांनी त्या-त्यावेळी बिले भरल्यास अशी समस्या निर्माण होणार नाही, असे सुतोवाच केले होते. परंतु वीज वितरणाच्या अशा या भुमिकेमुळे ग्राहकांनी नेमके करावे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काठीत पडून राहिलेल्या वीजबिलांमुळे अनेक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली असून असा प्रकार पुन्हा दिसून आल्यास ग्राहक रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

ग्राहकांमध्ये वाढता असंतोष

वीजबिलांवरच बिल भरण्याचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीत बिल न भरल्यास विलंब शुल्क आकारले जाते. बिल न भरल्यास वीज पुरवठाच खंडीत करण्यात येते. ही बाब नियमिततेसाठी योग्यच आहे, परंतु वीज वितरणाच्याच अशा कारनाम्यांना काय म्हणावे असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

बिल न भरल्यास ग्राहकांची चुकी म्हणून त्यांची अडवणूक होते, ती एकप्रकारे शिक्षाच ठरते. आता या प्रकारात वीज वितरणाचीच चुक दिसते. याची शिक्षा कोणाला द्यावी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com