सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताचा ८ डिसेंबरपासून यात्रोत्सव

यात्रौत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर दत्त मंदिराच्या सभागृहात प्रशासनाची बैठक, उपाययोजना करण्याच्या सूचना
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताचा ८ डिसेंबरपासून यात्रोत्सव

सारंगखेडा | वार्ताहर SARANGKHEDA

येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवास दि.८ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दत्त मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त होणारा चेतक महोत्सव देखणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रशासन आवश्यक ती मदत करेल, असे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी केले. बैठकीनंतर यात्रा स्थळांची पाहणी करण्यात आली.

एकमुखी श्री दत्त यात्रोत्सवानिमित्त होणार्‍या चेतक फेस्टीवल, अश्व बाजार देखणा करण्यासाठी सारंगखेडा दत्त मंदिर सभागृहात उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांच्या अध्यक्षस्थानी विविध विभागातील तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा यात्रोत्सव ग्लोबल झाला असून, यात्रेदरम्यान महिला भाविकांची उल्लेखनिय गर्दी असते. यात्रोत्सवास मोठ-मोठे सेलिब्रेटीही याठिकाणी आवर्जून हजेरी लावत असतात.

यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील द तेवीस कप या स्पर्धेच्या धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. देशभरातून अश्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. चेतक एन्डयुरन्स प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात घोड्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा व ज्यादा क्षमतेचे रोहित्र बसवावे. आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. कोरोना काळानंतर दरवर्षी प्रमाणेच नियोजन असल्याने संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करून फेस्टीवलसाठी आपले योगदान द्यावे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांनी सांगितले की, सारंगखेडा यात्रा ही पारंपरिक यात्रा असून, यात्रोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. यात्रा काळात येणार्‍या पर्यटकांना सोयी-सुविधांबरोबर सुरक्षाही दिली जाईल.

पोलीस प्रशासन कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही. यासाठी मोठया प्रमाणावर पोलीस, होमगार्ड व महिला पोलीसही नेमण्यात येणार आहेत. यात्रोत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याठिकाणी रहदारी व वाहनांना अडथळा येवू नये यासाठी लेआऊटप्रमाणे व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटावीत.

तसेच प्रत्येकाने अग्नीयंत्रही दुकानात ठेवावे, अशा सूचना दिल्या. तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांनी बांधकाम विभागाच्या आदेशाचे पालन करावे. यात्रोत्सव काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.

यात्रा काळात धुळ्याकडून येणारी वाहने दोंडाईचा-नंदुरबार मार्गे वळविण्यात येतील तर अंकलेश्वर-तळोदाकडून येणारी वाहने अनरदबारी मार्गे शिरपूरकडून वळविण्यात येतील. जागो जागी रहदारी व अडथाळा रोखण्यासाठी कंट्रोल रूम असेल. प्रत्येक विभागाचे कर्मचारी या विभागात कार्यरत असतील. घोडे बाजार, भांडी बाजार व विविध ठिकाणी पोलीस चौकीसह मदत केंद्र उभारले जाईल.

बैठकीत उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी पशुसंवर्धन विभागाने घोडयांची आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे यात्रा कालावधीत अग्नीशमन दलाच्या गाडया तत्पर ठेवाव्यात. यात्रेचा पूर्ण आराखडा तयार करून प्रेक्षणिय स्थानावर लावावीत जेणेकरून भाविकांना व पर्यटकाना यात्रेची यथोचित माहिती मिळेल असे आदेश दिले.

तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा व शिरपूर पालिकेने रोटेशन पद्धतीने आपापले अग्नीशामक दल तत्पर ठेवावेत. ग्रामविकास विभागाने जागा देतांना दक्षता घ्यावी. प्रत्येकाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व प्रत्येक विभागाने पथकांतील कर्मचार्‍यांचा मोबाईल नंबर एकमेकांजवळ ठेवावेत. व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून समूह बनवावेत.

यात्रोत्सवात आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे व तात्काळ सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी आपापले भ्रमणध्वनी कार्यान्वित ठेवावे.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, शहाद्याचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, वाहतूक नियंत्रक कुलकर्णी, वीज वितरण उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल,

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.दहाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आगळे यांनी केले.

आभार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी चेतक फेस्टीवल समितीचे सदस्य व ग्रामपंचात कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. यानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी घोडे बाजार व यात्रा परिसराची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com