जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दुर्गम भागात जावून नागरिकांशी साधला संवाद

पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही केली पाहणी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दुर्गम भागात जावून नागरिकांशी साधला संवाद

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) सध्या पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वताच्या (Satpuda mountain) रांगेत पावसाची तीव्रता अधिक आहे. अक्कलकुवा (Akkalkuwa) आणि धडगाव तालुक्यात (Dhadgaon Taluka) अतिवृष्टीमुळे (Heavy rain) नदीनाल्यांना पूर आला असून ते ओसंडून वाहत आहेत. या भागात पावसामुळे झालेले नुकसान समजून घेण्यासाठी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्यासाठी पाणी-पावसाची तमा न बाळगता नंदुरबारच्या (Collector Manisha Khatri) जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट दुर्गम भागात पोहोचल्या. त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधत जिल्हा प्रशासन तुमच्यासोबत असल्याचा त्यांनी संदेश दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरे, रस्ते व शेतीचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असतानाही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दुर्गम भागात पोहोचले.

त्यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देत मदतीचे आश्वासन दिले आहे. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी गुजरात मार्गे केवडीया येथून नर्मदा नदीतून बोटद्वारे अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेवटचे टोक मणिबेली, चिमलखेडी भूशा, सिंदुरी, गमन नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी पोहोचलेे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर आणि अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असून नुकसान झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत देवगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

तसेच पिंपळखुटा, जांगठी, गमन, सिंदुरी, चिमलखेडी, मणिबेली या गावांना जाण्यासाठी डोंगरदर्‍यांचा रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने दळण-वळणाची सुविधा विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचा ताफा दुर्गम भागात नुकसानग्रस्त भागांना भेट देण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनीही आभार मानले आहेत.

नर्मदाकिनारी बोटद्वारे गेलेल्या दौर्‍यामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या समवेत तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अक्कलकुवा गटविकास अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक सहभागी होते. पाहणी दौर्‍यादरम्यान चिमलखेडी येथील ग्रामस्थ नुरजी वसावे, नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे, लतिका राजपूत व चिमलखेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नर्मदा परीसरात अतीवृष्टीमुळे, झालेल्या नुकसानीचा व आरोग्य शिक्षण आणि पुनर्वसन विविध समस्या जिल्हाधिकार्‍यंनी जाणून घेतल्या. एकूणच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची जिल्हा प्रशासनाने पाहणी केली असून उपाययोजनांना वेग येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com