रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून धोबी कुटूंबियांची ३० लाखांत फसवणूक

माऊली मल्टीस्टेट पतसंस्थेवर कारवाईची मागणी
रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून धोबी कुटूंबियांची ३० लाखांत फसवणूक

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

पतसंस्थेत पैसे गुंतविल्यास रक्कम दुप्पट (Double the amount) होते अशी योजना माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीने (Mauli Multistate Credit Co-operative Society) सुरू केल्याचे सांगून खांडबारा येथील धोबी कुटुंबियांना (Dhobi family) सुमारे तीस लाख रुपयात गंडविल्याचा (cheated) प्रकार उघडकीस आला आहे.

या कुटुंबासह नंदुरबार, धुळे, जिल्हयासह अनेक जिल्हयांमधील आर्थिक गुंतवणूक करणार्‍यांना हजारो कोटी रुपयांमध्ये लुबाडण्यात आले आहे. याप्रकरणी पतसंस्थेचा माऊली मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे पदाधिकारी तसेच पतसंस्थेचा एजंट असलेल्या व सध्या जमाना येथे कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखावर कारवाई करुन तसेच मालमत्ता जप्त करुन न्याय मिळावा, अशी मागणी धोबी कुटूंबाने केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एकाच परिवारातील सौ.रुखसार जावेद धोबी, श्रीमती नसरीन रशीद शेख, चि. तौसिफ जावेद शेख यांनी माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत गुंतवणूक केली होती.

या सोसायटीत पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळतो, सोसायटीचा मी पदाधिकारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा असे अक्कलकुवा तालुक्यातील जमाना केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख रमण खंडू बिर्‍हाडे यांनी एजंट या नात्याने धोबी कुटुंबीयांना सांगितले.

म्हणून त्यांनी विविध योजनेत ३० लाख ९ हजार ८०० रुपये पतसंस्थेत गुंतवणूक केली. मुदत पूर्ण झाल्यावर त्यांना रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. माऊली मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने रक्कम परत करण्यास असमर्थता दर्शविली.

त्यामुळे सौ.रुखसार जावेद धोबी यांच्यासह तिघांनी ऍड.चंद्रकांत येशीराव यांच्या माध्यमातून ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली होती. त्यानुसार सोसायटीचे मॅनेजर, शिरुडचे कर्मचारी चेअरमन विष्णू रामचंद्र भागवत, संचालक रमण खंडू बिर्‍हाडे यांना नोटीस बजावण्यात आली. सुनावणीत रमण बिर्‍हाडे यांच्याव्यतिरिक्त सर्व प्रतिवादी अनुपस्थित होते. त्यामुळे झालेल्या सुनावणीप्रसंगी बिर्‍हाडे यांनी केलेले खुलासे आयोगाने अमान्य केले.

ग्राहक मंचाचे अध्यक्ष एस.पी.बोरवाल, सदस्य संजय जोशी यांनी माऊली सोसायटीला ठेवीदारांचे ३० लाख रुपये ४५ दिवसांच्या आत परत करण्याचे आदेश दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी दिले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत असताना आजतागायत फिर्यादींना भरपाई मिळालेली नाही.

रमण बिर्‍हाडे यांना कायद्याची भिती नसल्याने ते आर्थिक फसवणूकित पुढाकार घेत असल्याचे कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून दि.१० डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना विनंती अर्ज तसेच कोर्टाच्या निकालाची सत्यप्रत सादर करण्यात आली आहे.

तसेच स्मरणपत्रही देण्यात आले आहे. आरोपीवर फौजदारी व प्रशासकीय कार्यवाही करुन मालमत्ता जप्त करून फिर्यादी यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी धोबी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.