नंदुरबार : शहादा शहरातही दर रविवारी संचारबंदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही शहरात प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेर पडण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोलपंप आदी आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. दोन्ही शहरात इतर दिवशी सर्व आस्थापना व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील.

संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com