प्रतिकाशी श्रीक्षेत्र केदारेश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी

प्रकाशा ता.शहादा येथील तीर्थक्षेत्र श्री.केदारेश्‍वर महादेव मंदिर
प्रकाशा ता.शहादा येथील तीर्थक्षेत्र श्री.केदारेश्‍वर महादेव मंदिर

प्रकाशा | वार्ताहर- PRAKASHA

प्रकाशा ता.शहादा येथील तीर्थक्षेत्र श्री केदारेश्‍वर महादेव मंदिर (Kedareshwar Mahadev Temple) हे प्रतिकाशी म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) उत्तर काशीची (Kashi) यात्रा ही प्रकाशा येथील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केदारेश्‍वर महादेव मंदिराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यातच श्रावण महिना म्हटला म्हणजे या ठिकाणी भाविकांची पर्वणीच असते. याठिकाणी असलेल्या गौतमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वानिमित्त कुंभमेळा (Kumbh Mela) भरविण्यात येतो.

प्रकाशा ता.शहादा येथील गौतमेश्‍वर महादेव मंदिर
प्रकाशा ता.शहादा येथील गौतमेश्‍वर महादेव मंदिर

प्रकाशा हे गाव अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात भारतातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र मानले जाते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठे धार्मिक क्षेत्र व ऐतिहासीक गाव म्हणून प्रकाशाची ओळख आहे.

या गावात प्राचीन काळापासून लहान मोठी शेकडो मंदिरे आहेत. प्रत्येकाने सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत गावातील प्रत्येक मंदिरात जावून दर्शन घ्यायचे ठरवले तर संपूर्ण दिवस अपूर्ण पडेल. प्रकाशा गावाच्या बाहेर शेतात, मळयात, खळयात, वाडयात, भुयार्‍यात, कोपर्‍यात अशी अनेक लहानमोठी असंख्य प्राचीन काळातील बांधणी केलेली मंदिरे दिसून येतात.

संपूर्ण प्रकाशा गावात खोदकाम केल्यास जमिनीतून अनेक देवदेवतांचा दुर्मिळ मुर्त्या, महादेवाच्या पिंडी, गोल गोटे निघतील, यात शंका नाही. म्हणून तापी गोमाईचा काठावर मातीच्या उंच टेकडयांवर वसलेले प्राचीन काळातील वसाहत म्हणून प्रकाशाचा उल्लेख आहे.

प्राचीन उंच सखल टेकडयांचा मधोमध गोमाई नदीच्या काठावर पवित्र गौतमेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. पुर्वजांनी साधु, पुरोहितांनी भव्य कलाकुसरीने हे मंदिर उभारले आहे. काळानुसार भक्तांच्या सुख सुविधांसाठी मंदिराचा विकास करण्यात आला आहे.

तेथे आता बाराही महिने पाण्याचा जलसागर असतो. मंदिर परिसराला मोठमोठया हिरव्यागार टेकडयामुळे नैसर्गिक सौंदर्य व समृध्दी प्राप्त झाली आहे.

येथील केदारेश्‍वर महादेव मंदिर हे प्रतिकाशी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी प्राचीन शिवलिंग असून वर्षभर याठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. श्रावण महिन्यात तर भाविकांची मांदियाळीच असते.

उत्तर प्रदेशातील काशीची यात्रा ही प्रकाशा येथील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केदारेश्‍वर महादेवाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे जो भाविक उत्तर प्रदेशातील काशीचे दर्शन घेतो तो प्रकाशा येथे अवश्य भेट देवून आपली काशीची यात्रा पूर्ण करतो. या तीर्थक्षेत्राला लागूनच प्रकाशा येथील बॅरेज असून त्यात मोठया प्रमाणावर जलसाठा आहे.

‘तापी महात्म्य’ या पौराणिक ग्रंथातील संदर्भानुसार, प्राचीन काळी गौतम ॠषि हे प्रकाशा येथे तापीनदीच्या काठी तपश्‍चर्येसाठी आले होते. त्यांच्या प्रकाशा येथील वास्तव्यादरम्यान सिंहस्थ पर्वणी आली.

सिंहस्थ पर्वणीसाठी त्यांना नाशिक (त्र्यंबकेश्‍वर) या ठिकाणी जाण्याचे भाग्य लाभले नाही. म्हणून त्यांनी आपल्या तपोबलातून गोदावरी नदीला प्रकट केले. ही गोदावरी नदी म्हणजेच आजची गोमाई. पुलींदा ही गुप्त नदी असून सरस्वती नदीप्रमाणेच ती भुगर्भातून प्रकट झाली आहे. ही नदी भौगोलिकदृष्टया दिसत नसली तरी तिचे अस्तित्व जाणवते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

तापीनदीच्या पात्रात या तीनही नद्यांचा संगम गौतम ॠषिंनी घडवून आणला. आणि या संगमावर त्यांनी स्नान केले. तेथून जवळच शिवलिंगाची स्थापना केली. त्या महादेव मंदिरालाच गौतमेश्‍वर महादेव म्हटले जाते. तेव्हापासूनच याठिकाणी कुंभमेळा (अर्धकुंभ) भरविण्यात येतो, अशी अख्यायिका आहे.

प्रकाशातील पवित्र मानल्या जाणार्‍या पुरातन मंदिरांपैकी गोमाई नदीच्या तिरावरचे श्री गौतमेश्‍वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर सुर्यमुखी असून काही अंतरावर समोरच गोमाई नदी चंद्रकोर वलयाने सरळ तापी नदीला जावून मिळत असते.

तापी आणि गोमाई नदीचा संगम होत असतो. तेथून काही अंतरावर पुलींदा ही जमिनीतून निघालेली नदी आहे. गौतमेश्‍वर महादेवाचे मंदिर पुरातन काळातील आहे. पवित्र गोमती नदीच्या तटावर भव्य मंदिर पुर्वजांनी केले आहे.

अगदी कुशलतेने नक्षीदार कृतीबध्द देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी चढण्याकरीता मोठमोठया दगडांच्या पायर्‍या बांधल्या आहेत. गाभार्‍यात भव्य आणि दिव्य महादेवाची पिंड आहे. त्या काळात दगडांचा महादेव चबुतरा बांधला आहे.

आजुबाजूला भव्य पटांगण तयार करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत आहेत. तसेच संगमेश्‍वर मंदिराजवळील त्रिवेणी संगमावर तसेच तापीच्या घाटावर स्नान करुन महादेवाचे दर्शन घेतांना दिसत आहेत.

संगमेश्‍वर मंदिर
संगमेश्‍वर मंदिर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com