ठेकेदाराची ५३ लाखाची डिपॉझिट जप्त

रस्त्याच्या कामाची जबाबदारी नाकारली
ठेकेदाराची ५३ लाखाची डिपॉझिट जप्त

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

रस्त्याच्या कामाची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी असताना त्यास स्पष्ट नकार दिल्याने तळोदा येथील एका ठेकेदाराची (Contractor) ५३ लाख रुपयांची डिपॉजीट (deposit) सार्वजनिक बांधकाम विभागाने जप्त (seized) करून त्या रकमेतून सदर रस्त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठेकेदारावरील या कारवाईने सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केली असून अशा कारवाईत सातत्य राखण्याचा अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद या १२ किलोमिटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सन २०१८ मध्ये करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या रस्ते विकास योजनेतून रस्त्याचे काम झाले होते. साधारण ४ कोटी रुपये त्यावेळी मंजूर करण्यात आले होते.

तथापि अत्यंत निकृष्ट दर्जाचा कामामुळे दीड, दोन वर्षातच रस्त्याचे तीन तेरा वाजले होते. कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडले होते. परिणामी ग्रामीण जनतेमधून संबंधित यंत्रणेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. साहजिकच रस्त्याच्या डागडूजी करण्याचे आदेश यंत्रणेने ठेकेदाराला दिले होते.

मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले होते. वास्तविक रस्त्याचे डांबरीरण केल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी सबंधित ठेकेदाराची असते.

असे असताना या मुजोर ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचा आदेश धुडकावून लावला होता. शेवटी यंत्रणेने त्याची ५३ लाखाची डिपॉझिट जप्त करून सदर रस्त्याची दुरुस्ती नुकतीच पूर्ण केली आहे. तथापि, ही दुरुस्तीही निकृष्ट केल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता सबंधित ठेकेदारास नियमाप्रमाणे अनेकवेळा लेखी नोटीस देण्यात आली होती. परंतु त्याने दुरुस्तीचे काम करण्यास दुर्लक्ष केल्याने त्याची डिपॉजीट जप्त करून या जप्त केलेल्या रकमेतून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

नितीन वसावे, उपविभागागीय अभियंता.सार्वजनिक बांधकाम विभाग,कार्यालय तळोदा.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com