
नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी
जिल्ह्यातील कुपोषणाच्या (Malnutrition) निर्मूलनासाठी (Eradication) पौष्टिक आहाराचे (Nutritious diet) नियोजन करणे महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात पोषण तत्व असलेल्या रानभाज्यांचा (Ranbhaji) समावेश केल्यास कुपोषणाची समस्या दूर होऊ शकते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी रानभाजी महोत्सवाच्या (Ranbhaji Mahotsava) उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकार्यांनी केले. दरम्यान, जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी पायपीट (Pipette) करुन प्रत्यक्ष डोंगर चढून विविध कामांची पाहणी केली.
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार, एकलव्य आदिवासी विकास मंडळ, कंजाला तसेच ग्रामपंचायत, डेब्रामाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कंजाला ता. अक्कलकुवा येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री उपस्थित होत्या. डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील अध्यक्षस्थानी होते. नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेन्द्र दहातोंडे, तहसीलदार श्री. राठोड यांची विशेष उपस्थिती होती.
कंजाला येथील भगर प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकार्यांनी भेट दिली. भगर प्रक्रिया युनिटची सर्व माहिती बचत गटाच्या महिलांकडून त्यांनी जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की सातपुडा पर्वत रांगातील महत्वाचे पीक-भगर, बर्टी, मोर यासारख्या तृणधान्यवर प्रक्रिया करणे गरजेचे असून या पोषक धान्यावर मूल्यवर्धन केल्यास त्याचा तेथील जनतेस लाभ होईलच, त्यासोबतच शेतकर्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. त्यासाठी ग्रामीण स्तरावर असे प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी शासनाचे प्रोत्साहन राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कंजाला गावच्या पाड्यावर प्रत्येक घरापर्यंत पाण्याची व्यवस्था पोचविण्याच्या पथदर्शी प्रकल्पाची जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष डोंगर चढून पाहणी केली. गावातील समस्या सोडवण्यासाठी स्थानिक युवकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. अशाप्रकारे सातपुड्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पेसा निधीच्या माध्यमातून गावाच्या सहभागाने साकारलेले मॉडेल सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी या पाणीपुरवठा मॉडेल तसेच फेरो सिमेंट तंत्रज्ञानाची विशेषता सांगितली.
एकलव्य आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून असलेल्या जैवविविधता केंद्रास त्यांनी भेट दिली. अशा प्रकारच्या जैवविविधता संवर्धनातून आगामी काळात हवामान बदलामुळे येणार्या शेती क्षेत्रासमोरील आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डेब्रामाळ ग्रामपंचायतमधील पाच गावातील महिलांनी रानभाजी महोत्सवात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या महिलांशी जिल्हाधिकार्यांनी रानभाज्यांच्या पोषक गुणाबद्दल संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य आदिवासी मंडळाचे रामसिंग वळवी यांनी केले. जैवविविधतेच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती देत रानभाजी महोत्सवाचा आढावा मांडला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कृष्णदास पाटील यांनी रानभाजी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले आणि कुपोषणकडून सुपोषणाकडे जाण्याचा हा राजमार्ग असल्याचे सांगितले. नाबार्डचे प्रमोद पाटील यांनी अक्कलकुवा मोलगी परिसर- अमोप-शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार्या विविध व्यवसायांची,योजनांची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कंजाला परिसरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विषय विशेषज्ञ सौ.आरती देशमुख, कार्यक्रम सहाय्यक राजेश भावसार, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. वाघ, कृषी विभागाचे श्री. डी. पी. गावित, वनविभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच मोलगी परिसर सेवा समितीचे आपसिंग वसावे, मनोहर पाडवी, धडगाव येथील नाना पावरा, विनायक वळवी, सायसिंग वळवी, वीरसिंग वळवी तसेच परिसरातील शेतकरी, महिला उपस्थित होत्या.