
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी आज तळोदा तालुक्यातील (Taloda Taluka) उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, शासकीय धान्य गोडावून येथे भेट देऊन पाहणी (inspected) केली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, तहसिलदार गिरीश वखारे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल चौधरी, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नियमित कामकाजाचा भाग म्हणून आज तळोदा तालुक्यास भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी चौगाव ब्रु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
यानंतर त्यांनी शासकीय धान्य गोडाऊन, तळोदा येथे जावून गोदामाची तपासणी करुन धान्यसाठ्याची माहिती घेतली. तसेच चौगाव ब्रु. येथील स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करुन त्यांना नागरिकांना नियमित धान्य वितरणाच्या सूचनाही दिल्यात.
श्रीमती खत्री यांनी उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे भेट देवून प्रसुती कक्षातील गरोदर मातांशी संवाद साधुन रुग्णालयातील परिचारिकांना प्रसुतीसाठी येणार्या महिलांना स्तनपानाचे महत्व तसेच पोषण आहाराबाबत नियमित मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या.
यानंतर त्यांनी उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच इतर शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोटखराब क्षेत्राबाबत सुधारीत सातबाराचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याविविध भेटी दरम्यान रुग्णालय अधिक्षक डॉ.गणेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी बी. के. पाटील, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी सुषमा चौरे, कृषी सहायक गांगुर्डे आदी उपस्थित होते.
ई-पीक पाहणीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
श्रीमती खत्री यांनी तळोदा तालुक्यातील आमलाड येथील शेतकरी योगेश पाटील या शेतकर्यांच्या शेत शिवाराला भेट देऊन ई-पीक पाहणीच्या नव्या प्रणालीची माहिती दिली.
ही नवीन प्रणाली पारदर्शक असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकर्यांना उपयुक्त ठरेल. शेतकर्यांनी स्वतः ही प्रणाली हाताळायची असून ती अत्यंत सोपी व सुलभ असल्याने सर्व शेतकर्यांनी हे नवीन प डाऊनलोड करून ई-पीक पाहणीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.