पोलीस कवायत मैदानात सामूहिक योगा

 पोलीस कवायत मैदानात सामूहिक योगा

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

नंदूरबार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त (International Yoga Day) पोलीस कवायत मैदान (Police drill ground) नंदुरबार येथे सामूहिक योगाचे (collective yoga) आयोजन करण्यात आले होते.

सूर्य हा सर्व शक्तीचे प्रतिक मानला जातो . दि. 21 जुन रोजी वर्षातील सूर्याची किरणे सर्वाधिक काळ पृथ्वीवर पडतात तसेच याच दिवशी सुर्याचे दक्षिणायन सुरु होते .म्हणुन 21 जून या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे .

सन 2014 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व नेत्यांसमोर योगाचे महत्व पटवून देवून 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणेबाबत आवाहन केले होते . त्यानंतर तीन महीन्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने ठराव पारित करुन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली .

मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे . इतर शारीरिक व्यायाम प्रकारांबरोबर योग या व्यायाम प्रकारास सार्‍या जगात मान्यता मिळाली आहे . योगामुळे मानवी जीवनात शारीरिक , मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात . योगामुळे शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यास मदत होवून माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते .

योगा आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथे सामुहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी काल नंदुरबार जिल्ह्यातील जनतेस जास्तीत जास्त संख्येने जिल्हा पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथे आयोजित सामुहिक योग प्रात्यक्षिकासाठी हजर राहण्याबाबत आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देवुन पोलीस विभाग, महसूल विभाग व आरोग्य विभाग यातील अधिकारी व कर्मचारी तसेच नंदुरबार शहरातील विविध शाळा कॉलेजातील एकुण 240 ते 300 नागरिक सामुहिक योग प्रात्यक्षिकास उपस्थित होते.

सकाळी 7 वाजता जिल्हा पोलीस कवायत मैदानावर दोन सत्रात सामुहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात आनंद योग नॅचरोपॅथी हेल्थ सेंटरचे योग निसर्गोपचार तज्ञ चंद्रशेखर आनंदराव वसईकर व केसरसिंग क्षत्रिय यांनी निसर्गोपचारातुन योग साधना याबाबत मार्गदर्शन केले . तसेच श्री. वसईकर यांनी नैसर्गिक योग साधनेचे महत्व समजावून सांगुन उपस्थितांकडुन योगाचे प्रात्यक्षिक करुन घेतले.

दुसर्‍या सत्रात सहजयोग साधनेचे मुख्य प्रशिक्षक डॉ .हितेश शाह व प्रियंका साळुंखे यांनी मानवी शरिराच्या विविध अवयवात असलेल्या शक्ती केंद्रांचे महत्व समजावुन सांगुन सहजयोग साधनेतुन त्या केंद्रबिंदुचा वापर करुन मानसिक स्वास्थ कसे मिळवले जावु शकते . याचे महत्व सांगुन त्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करवून घेतले . सदरचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री , जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , व नंदुरबार जिल्ह्याचे शल्य चिकीत्सक चारुदत्त शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . कार्यक्रमासाठी या मान्यवरांसह पोलीस , महसुल व आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी तसेच नंदुरबार शहरातील विविध शाळा कॉलेजातील तरुण - तरुणी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com