जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणच्या व्यवसायीकांची कोरोना चाचणी करावी

जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे निर्देश
जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणच्या व्यवसायीकांची कोरोना चाचणी करावी

नंदुरबार Nandurbar । । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोना संसर्ग (Corona infection) वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण यावे तसेच विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना (Measures) राबविणे आवश्यक असल्याने यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासह भाजीपाला विक्रेते,दुकानदार गर्दीच्या ठिकाणीच्या व्यवसायीकांची कोरोना चाचणी (Corona testing of professionals) प्राधान्याने करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी दिले आहेत.

कोविड-19 पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे (शहादा) सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या वाढत असल्याने अशा ठिकाणी अधिक लक्ष द्यावेत. कोरोना बाधितांची संख्या असलेल्या ठिकाणांची संपर्क साखळी शोधुन बाधीत व्यक्तिंच्या निकटवर्तीयांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा. बाधीत रुग्णांच्या प्रवासाच्या तपशिलाची माहिती घ्यावी. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान 200 स्वॅब संकलन करावेत. भाजीपाला विक्रेते, दुकानदार,सलून चालक, गर्दीच्या ठिकाणाच्या व्यायसायिकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी. आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामधील आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड, पुरेसा औषधासाठा व वैद्यकीय साधनसामग्री, आरटीपीसीआर किट, न्टीजन किटची मागणी आदींचे आतापासूनच नियोजन करावे. ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यासंदर्भात आवश्यक ते करारनामे करावेत. पोलीस विभाग, घटना व्यवस्थापक, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, यांनी लग्न समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक, बंदिस्त असो किंवा खुल्या जागेत इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करावे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्ती व 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी. अंत्यविधीच्या बाबतीत जास्तीत जास्त 20 लोकांसाठी उपस्थितीची मर्यादा असल्याने यापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई करावी. दुकान आणि बाजारात मास्क न घालणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी यावेळी दिलेत.

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजन करावे. आता 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळा व आश्रमशाळेत तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनी तातडीने लस घ्यावी. शाळा व आश्रमशाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वॅब संकलन करावे यासाठी कॅम्पचे आयोजित करण्यासाठी नियोजन करावे. ओमायक्रॉनफ या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करावे. नागरिकांनी लग्न, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत व रस्त्यावर अनावश्यक गर्दी टाळावी, वारवांर हात धुवावे, मास्क वापरावा आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com