महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा या तारखेपासून परीक्षांवर बहिष्कार

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा  या तारखेपासून परीक्षांवर बहिष्कार

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मागण्यासाठी दि.2 फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या (examinations) कामकाजावर बहिष्कार (Boycott) आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती (non-teaching staff) समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे.

या आंदोलनात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.वाय.पाटील आणि सरचिटणीस डॉ.ऋषिकेश चित्तम, यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश आप्पा पाटील जळगाव, उपाध्यक्ष भटू बडगुजर नंदुरबार, धुळे जिल्हाध्यक्ष शालिकराव तिरमले शिरपूर, रवींद्र बोरसे धुळे, जळगाव जि.अध्यक्ष ए.के.पाटील, उपाध्यक्ष अजय शिंदे नूतन जळगाव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मनिष कलाल तळोदा, जे.पी.चौधरी खापर, विजय सजन पाटील अमळनेर, कल्याण पाटील, बापू भावसार साक्री, सचिन पाटील मारवड, बी.टी.पाटील पारोळा, शशिकांत पाटील धुळे, के.बी.पाटील धुळे, संग्रामसिंह पाटील नंदुरबार, विजय सोंजे पाचोरा, प्रसाद पाटील पारोळा, मनोज चौधरी नवापूर, बी.बी.गिरासे दोंडाईचा, जितेंद्र चौहान शहादा, जितेंद्र परदेशी धरणगाव, छोटू जाधव, सुनील भामरे आदी उपस्थित होते.

कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले असून कर्मचारी 16 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनानी स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासनाशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षेची यंत्रणा कोलमडणार आहे.

मागण्या

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करावी.सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू करावी.सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगलागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी.विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी.2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागू करावी. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी.

आंदोलनाचे टप्पे

2 फेब्रुवारी 2023 पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 2.30 अवकाश काळात निदर्शने. 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे. 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप. 20 फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com