
खापर Khapar । वार्ताहर -
बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील वाण्याविहिर ते गव्हाळीदरम्यान हॉटेल्स व ढाब्यावर बायोडिझेलची (Biodiesel) अवैधरित्या विक्री (Illegal sale) सुरू आहे. महसूल (Revenue) व पोलीस (police) विभागाचे ‘अर्थ’पूर्ण संरक्षण असल्याने अवैध बायोडिझेल विक्रेते जोमात असल्याची चर्चा आहे. दिवस भरात लाखों रुपयांची यातून उलाढाल होत असून उघडया डोळ्यांनी दिसणार्या प्रकारावर तालुक्यातील अधिकार्यांही डोळे मिटल्याने त्यांना ‘वरकमाई’ मिळत असल्याची चर्चा सुरु आहे.
महामार्गावरून दळणवळण करतांना सर्वसामान्यांना हॉटेल्स व ढाब्यावर (hotels and dhabas) विकले जाणारे बायोडिझेल सहजच दिसते, पण तालुक्यातील प्रशासन (Administration) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे डोळे असून आंधळे असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. यात पोलीस विभागात गोपनीय माहिती ठेवणार्या डी.बी. पथकाला (D.B. squad) उघडपणे बायोडिझेलच्या विक्रीची माहितीच नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर विक्रेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हॉटेल्स व ढाब्यांवर बायोडिझेल (Biodiesel) विक्री करतांना आढळल्यास विक्रेत्यांसह जमीन मालकांवर सुध्दा कारवाई होईल असे सक्तीचे आदेश प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष (Prantadhikari Dr. Manak Ghosh) यांनी अगोदर झालेल्या छाप्या दरम्यान सांगितले होते. त्यामुळे आता बायोडिझेल विक्रेत्यांनी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. चक्क चालत्या फिरत्या मालवाहतूक गाडीतच धंदा सुरू केला आहे. एका ठिकाणी गोदामात संग्रह करायचा व तेथून लहान मालवाहतूक गाड्याच्या साहाय्याने हॉटेल्स व ढाब्यावर विकायचे असला प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे.
अक्कलकुवा तालुक्यात 4-5 हॉटेल्स व ढाब्यावर सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीमध्ये (Biodiesel sales) दिवसाला 5 लाखाच्या वर उलाढाल होते.एकंदरीत महिन्याचा हिशोब केला तर 1 कोटींचा वर आकडा जातो. ज्यांची पोलीस व महसूल विभागाला जाणीव असून वरकमाई मिळत असल्याने कारवाई ऐवजी छुपे संरक्षण (Hidden protection) दिले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून अवैध धंदे फोफावत चालले आहेत. प्रशासनाला कधी जाग येईल की झोपेचे सोंग केलेले आहे, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यासोबतच तळोदा, नवापूर, शहादा, नंदुरबार तालुक्यातही बायोडिझेलची अवैधरित्या सर्रास विक्री सुरु आहे. परंतू पोलीस व महसूल प्रशासनाने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.