
नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आसाणे (AaSane) येथील 85 व्या वर्षी निराधार आजीला (helpless grandmother) सामाजीक कार्यकर्त्याच्या (social worker) मदतीने दोन दिवसात हक्काचे रेशनकार्ड (ration card) मिळाले.
एकीकडे स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना दुसरीकडे रहायला घर नाही, त्यामुळे घराचा पत्ता नाही, पत्ता नसल्यामुळे रेशन कार्ड नाही, रेशनकार्ड नाही, म्हणून मतदानात नाव नाही, मतदान कार्ड नाही म्हणून आधार कार्ड नाही असे अनेक समस्यांनी आसाणे ता.नंदुरबार येथील 85 वर्षीय आजीबाई तापाबाई लहाना ठेलारी त्रस्त होत्या. त्या जंगलात राहुन मेंढ्या व कोंबड्या चारणे मिळेल तिकडे चार्यासाठी स्थलांतर करणे, अशा अनेक अडचणीत सापडल्या होत्या
. या आजीला दोन तरणीबांड पोरं 15 -16 वर्षांपूर्वी तालुक्यातील काकरदे येथे तर दुसरा न्याहली येथील पूलावरून मोटार सायकलसह पडून अपघातात मरण पावली. शेती नाही, घरं नाही, जंगलात उघड्यावरच राहते. अगदी कोरोना काळात 2 वर्ष आजीला रेशन वा कुठलीच मदत मिळाली नाही, गावातील ओळखीच्या घरांनी आजीला तांदूळ वगैरे दिले. आजी वयाच्या 85 व्यावर्षी ही स्वाभिमानाने जगतेय, पण भीक मागत नाही.आजीची उपजीविका कुक्कुटपालनातून अंडी विक्री करून होतेय.
दरम्यान, आसाने येथील सामाजिक कार्यकर्ते व जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी आजीचा जगण्यासाठीचा संघर्ष पहिला व मदत करायचे ठरवले.आजीला रेशन कार्ड काढायचा व निराधार योजनेचा पगार चालू करून देण्याचा निर्णय घेतला. परंतु कागदपत्रे नसल्यामुळे या, ना, त्या अडचणी येत होत्या.
शेवटी हरवलेले आधार कार्ड नवीन काढून गावातील एका जणाने आजीला भाडेकरू म्हणून घराचा उतारा दिला.त्यानंतर समाधान पाटील यांनी बँक पासबुक बनवले, आजीला स्व-खर्चाने नंदुरबार घेऊन जाऊन वेंडरकडून फार्म भरून घेतले, येथेही वेंडर मनोहर मिस्त्री यांनी आजीची परिस्थिती पाहून 1 रुपयाही घेतला नाही.
तहसिलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा शाखेतील कर्मचार्यांनी आजीची परिस्थिती पाहून दोन दिवसात रेशनकार्ड काढून दिले. निराधार योजनेसाठी लागणारा 21 हजाराचा उत्पन्नाचा दाखला लगेच काढून देण्याचे आश्वस्त केले, अन तोही 3-4 दिवसात दिलाच. लवकरच आजीचा निराधार योजनेचा मानधनाचे प्रकरण जमा करण्यात येणार आहे. वयाच्या 85 व्या वर्षी निराधार आजीला दोन दिवसात रेशनकार्ड मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.