सामाजिक मुल्यांचा उत्सव असणारी अश्वत्थामा ॠषिचा आज यात्रौत्सव

सामाजिक मुल्यांचा उत्सव असणारी अश्वत्थामा ॠषिचा आज यात्रौत्सव

दत्तात्रय सूर्यवंशी

तळोदा Taloda ।

सातपुडा पर्वत रांगेतील (Satpura mountain range) अश्वत्थामा ऋषीची यात्रा (Journey of Sage Ashwatthama) म्हणजे महाभारतातील (Mahabharata) पात्रांचा संबंध व महाभारतकालीन घटनांना दरवर्षी उजाळा देत आदिवासी संस्कृतीत (tribal culture) भिनलेल्या सामाजिक मूल्यांचा उत्सव (Celebration of social values) साजरा करण्याची परंपरेचा वारसा आहे.

महाभारतातील कौरव पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होते. त्यांचे पूत्र अश्वत्थामा ऋषी यांची यात्रा भरते. सप्तचिरंजीवांपैकी एक असल्याने ते आजही आहेत, असे मानले जाते. दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील लाखो भाविक हजारो वर्षांपासून पदयात्रेने दर्शनासाठी येतात.काही नवस करायला येतात. काही नवस फेडण्यासाठी येतात.भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

या यात्रा प्रवासाची सुरूवात दिराणी जेठाणीपासून होते. यांना कुणी कुंती आणि गांधारी म्हणून संबोधतात.तर काहीजण या दोन्ही तेल विकण्यासाठी अस्तंबा येथे जात होत्या. मात्र तेथे स्त्री प्रवेश वर्ज्य असल्याने रस्त्यातच शिळा होऊन पडल्या अशी अख्यायिका सांगितली जाते. पहिल्या टेकडीवर गोर्‍यामाळ आहे. याला गोवाल्यादेव म्हणतात. गो म्हणजे गाय व वाल्या म्हणजे राखणदार म्हणजेच गोपाल श्री कृष्ण असे म्हणतात.दुसरी टेकडी नकटादेव आहे. पाच पांडवांपैकी नकुल असल्याचे सांगितले जाते.

तिसरी टेकडीच्या पायथ्याशी भिमकूंड आहे. येथून अश्वत्थामा ऋषीचे शिखर आहे. हे या परीसरात सर्वात उंच शिखर असल्याने शिग्गर म्हटले जाते.त्यावर अश्वत्थामा विराजमान असल्याने त्यांचा उल्लेख शिग्गरवाले बाबा केला जातो. तसा जयजयकार केला जातो. शिखर उतरताना मामा व भांजा असे दोन स्थान येतात. यांचा संबंध शकुनी व दूर्योधनशी असावा. यांच्याकुटील कारस्थानमुळेच महाभारत घडले, ते पाहता येथे यात्रेकरू मामा मांजा सोबत दर्शन घेत नाहीत. जवळ असले तरी या परीसरात लांब लांब होतात. पुढे खाली उतरल्यावर हिडींबाचे जंगल आहे. राक्षसपूत्री हिडींबा व भिमा यांचा विवाह झाल्याचा उल्लेख महाभारतात आहे. येथे हिडींबादेवी मंदीरही आहे. यात्रेकरू सहसा येथे जात नाही.

सातपुडा पर्वताचे शिखर-डोंगर भागात हजारों वर्षांपासून महाभारतातील पात्रांचा संबंध व परीचय आजही आहे. परीसरात मुख्य पात्र गुरू द्रोणपूत्र अश्वत्थामा ऋषीचे आहे. कौरव व अश्वत्थामा मिळून पांडवांचे पाच पूत्र झोपेत असताना त्यांचा वध केला व उत्तराच्या गर्भाचा नाश केला. याचा बदला व शिक्षा म्हणून श्री.कृष्णाने अश्वत्थामाच्या डोक्यावरील मणी काढून घेतला, त्याला डोक्यावर जखम झाली. भिमाने अश्वत्थामाला पकडण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करत टेकडीच्या पायथ्याशी आला.

तेव्हा अश्वत्थामा भिमाच्या हाती लागू नये म्हणून जेथे कोणी जाऊ येऊ शकत नाही अशा अवघड स्थानावर गेले. भिम खाली बसून वाट पाहू लागला. यावेळी भिमला तहान लागली.तेथे गदा मारून पाणी काढले. तेच कूंड भिमकूंड म्हणून ओळखले जाते. कुंडातूनच नदीचा उगम झाला आहे.सर्व यात्रेकरू अश्वत्थामाचे शिखर चढण्यापूर्वी या कूंडात स्नान करून चढायला सुरुवात करतात. शिखराच्या सर्वोच्चस्थानी उघड्यावर शिळा आहेत. भगवा ध्वज डौलाने फडकत असतो. येथेच कूंकू, तांदूळ, गुलाल, ध्वजा, चढवल्या जातात. पूजारी तुणतूणे व बासरीचा ठेका धरून ईशस्तवन, भक्तीगीते गात असतात. या स्थानाच्या खाली कपारीत गेल्यावर देव दरवाजा आहे. येथेही पूजा करतात. दगडाच्या कपारीला कान लावल्यावर कर कर असा कोणीतरी झूला झूलत असल्याचा आवाज येतो. अश्वत्थामा महाराज सोन्याच्या बंगोळीवर झूलतो असे येथील पूजार्‍यांचे मानने आहे. अश्वत्थामा ब्रह्मचारी असल्याने येथे दर्शनासाठी स्त्रीयांना प्रवेश वर्ज्य आहे.

अश्वत्थामा हे महाभारतातील नकारात्मक पात्र आहे. पण ते सप्त चिरंजिवांपैकी एक असल्याने ते आजही आहेत असे मानले जाते. ते जिवंत दैवत असल्याच्या समजातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारे दैवत आहे. याच अनूभवातून अश्वत्थामा यात्रेला हजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. अश्वत्थामा चिरंजीव व ब्रह्मचारी असल्याने या यात्रेला हजारो भाविक भक्तीभावाने नियमांचे पालन करतात. अनेकजण यात्रेला जाण्याआधी सव्वा महिना कुटूंबापासून लांब गावालगत शेतमळ्यात, पटांगणात राहतात. खाटेवर झोपेत नाही.स्रीयांचा हातचे अन्नपदार्थ खात नाही. मांसाहार दारुपासून लांब राहतात. व्रत नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. यात्रापूर्ण झाल्यावरच घरात प्रवेश करतात.

आदिवासी समाजात अश्वत्थामा ऋषी, देवदर्शनाला खूप महत्त्व आहे. दर्शनाला जाताना अनेक जण आपल्या शेतातील नवीन पिक, धान्य सोबत घेऊन जातात. देवाव चढवल्याशिवाय घरी त्या धान्याला खायला वापरत नाहीत. ज्यांचाकडे गाय, म्हैस, बैल, शेळ्या आहेत असे पशूपालक सोबत दोर घेऊन जातात. त्या स्थानावर बसलेल्या पूजार्‍यांकडून मंत्रोच्चार करून आणतात.गुरांना बांधण्यासाठी याचा वापर केला तर रोगराई येत नाही असा समज आहे. वन औषधी असलेल्या रोयचाचा गुच्छाची पूजा करून घरी घेऊन येतात.एखादा पशू आजारी पडला तर त्याला रोयचे जाळून धुनी देतात. अनेक प्रकार परंपरेने, श्रद्धेने सुरू आहेत.

आदिवासी समाजात गावदिवाळीची परंपरा वर्षांनूवर्षे सुरू आहे. या गावदिवाळीचा शुभारंभ दरवर्षी जूना अस्तंबा येथून होतो. धनतेरस, काळी चावदस असे दोन दिवस येथे दिवाळी, म्हणजे सोंगाड्या पार्टीचे आयोजन केलेले असते. सोंगाड्यापार्टी आपल्या विविध कलागुणातून समाज सुधारणा, व्यसन मुक्ती, गाव एकी, शिक्षण व आरोग्याचे महत्त्व, सांगतात.हसवता हसवता माणसाला आपल्यातील गूण दोषांचे दर्शन घडवतात. येथील दिवाळी झाल्यावरच प्रत्येक गावोगावी सोंगाड्या पार्टीचे माध्यमातून गावपुढारी दिवाळीचे आयोजन करतात. गावदिवाळी म्हणजे गावापुरता उत्सवच असतो. गावोगावच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आमंत्रण दिले जाते.

अश्वत्थामा ऋषी यात्रा समारोप समारोह साधारणतः तिसर्‍या दिवशी तळोद्यात असतो. गावोगावीचे यात्रेकरू पथके शहराबाहेरील शेतमळे, शाळा महाविद्यालयाचे मैदानावरून ताशांच्या गजरात देवीदेवतांची विविध रूपे धारण करून मिरवणुकीने, प्रत्येक पथक आपापला वेगळेपणा जप्त, शिस्तबद्ध पद्धतीने नाचत, गात, रोयचाचे तूरे, तलवारी नाचवत, विविध वाद्ये वाजवत, विशिष्ट कपडे परिधान करून मिरवणुकीने शहरातील मारुती मंदिरांवर येतात. पूजाअर्चा करतात. दर्शन घेऊन यात्रेची समाप्ती होते. यात्रेकरूंना घरी, गावाला घेऊन जाण्यासाठी प्रत्येक गावातील मुले मुली महिला पुरुष, नातेवाईक बैलगाडी, ट्रॅक्टर, रिक्षा, कार, उपलब्ध वाहनाने आलेले असतात. शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. पूर्ण शहर ताशांच्या गजरात, भक्तीपूर्ण वातावरणात न्हाऊन निघालेले असते.

जयघोष

अश्वत्थामा ऋषी यात्रा डोंगर कपारी, दर्‍याखोर्‍यातून पायी चालत असताना थकवा जाणवू नये, हिस्र श्वापदांची भिती वाटू नये. जोश भरण्यासाठी घोषणा निनादत असतात. सिग्गरवाले जय, दिराणी जेठाणी जय, गोर्‍यामाळ जय, घोले घोल जय, पाणी ना झरा जय, नकटादेव जय, काकडीस्थान जय, जूना अस्तंबा जय, भिमकूंड जय, आडवा दगड जय, उभा दगड जय, साबरबारी जय, केळीना खोड जय, रोयचा वाले जय, तूरा वाले जय, घोल गिंदोली जय, विंछू काटा जय, साप सरडा जय, घोडा ना टापा जय, रथ नी चकारी जय, टेंभावाले जय, नादान पोवा जय, येई राहीना जय, तूना दरबार या जय, नाडा टाकी जय, लेजो जय, देव दरवाजा जय, बडे बडे पत्थर वाले महाराज की जय, तांबाऋषी महाराज की जय, दरी खाई जय, डुगडूग्या पत्थर जय, मामा भांजा जय, देवनदी जय, रोयचानी सपाटी जय, देवनदी जय, चांदसैली जय, माकड टेकडी जय, कोठार ना घोल जय, रोझवा नी सपाटी जय, अशा घोषणा एक जण देतो व बाकीचे त्याचा मागे जयचा जयघोष करीत वातावरण भक्तिमय करून अथक परिश्रम करत चालत राहतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com