नंदुरबार बाजार समितीत सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक

मार्चअखेरीस तीन लाख क्विंटलपर्यंत आवक जाणार, अठराशे ते चारहजारापर्यंतचा दर
नंदुरबार बाजार समितीत सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) लाल मिरची (Red pepper) खरेदीने सव्वा लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत तीन लाख क्विंटलपर्यंत आवक (Incoming) होण्याची शक्यता आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने सव्वा लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिरचीला सध्या अठराशे ते चार हजारापर्यंत दर असून मिरची उत्पादक शेतकर्‍यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.महाराष्ट्रात ओल्या लाल मिरची खरेदीसाठी अव्वल मानल्या जाणार्‍या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबर अखेर १ लाख २५ हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे मिरची पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले उत्पादन व दर मिळत आहे. मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नंदुरबार या तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या खरीप हंगामात जवळपास ३ हजार ५२३ हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली गेली होती.

जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाले असले तरी शेतकर्‍यांच्या मेहनतीने मिरची पिकात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी लगबग आहे. दोन वेळा अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे,

तसेच दरवर्षीप्रमाणे मिरची पिकावर येणार्‍या रोगांमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक बोजा असल्याने सध्या मिळणार्‍या दरांपेक्षा आणखी चांगले दर मिळावे अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षी पूर्ण हंगामात ८० हजार क्विंटलची आवक झाली होती. यंदा डिसेंबर अखेर पर्यंत दुप्पट मिरचीची आवक झाली आहे. मिरची खरेदी विक्रीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळत आहे.

बाजार समितीत सुरुवातीला दर कमी होते, परंतु आता कमीत कमी अठराशे पासून ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिरचीच्या दर्जानुसार शेतकर्‍यांना भाव मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ओल्या लाल मिरचीला चांगले दर मिळत आहे, दररोज दोनशे ते अडीचशे वाहनांमधून विक्रीसाठी मिरची बाजार समितीत येत असल्याने आवकमध्ये वाढ झाली आहे.

मार्चअखेरपर्यंत अडीच ते तीन लाख क्विंटल आवक येण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातूनही मिरची उत्पादक शेतकरी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने यंदा मिरची आवकमध्ये वाढ झाली आहे.

आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर येथील मिरची खरेदीचे भाव पाहता नंदुरबार येथे शेतकर्‍यांना मिळणारा भाव कमी असल्याने व्यापार्‍यांनी आणखी चांगले दर मिरची उत्पादक शेतकर्‍यांना द्यावे अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com