कोठार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा
तळोदा ।Taloda । ता.प्र.
तालुक्यातील कोठार (Kothar) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) मंजूर (Approved) करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी (State Executive Member Dr. Shashikant Vani) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह आ.राजेश पाडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील कोठार हे सातपुड्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील जवळपास पन्नास गावपाड्यांना जोडणारे गाव आहे. कुयलीडाबर, आंबागव्हाण रोझवा पुनर्वसन, जांभाई, बंधारा, गौर्या, चौगाव, माळ खुर्द, पठाली, वरपाडा यांच्यासह अनेक लहानमोठे गाव-पाडे कोठारच्या पंचक्रोशीत वसलेली आहेत.
यातील काही गावे ही प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही गावे वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येतात. या गावातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ह्या गावाचे अंतर सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात दळणवळणाच्या सोयी सुविधा देखील यामध्ये उपलब्ध नाहीत.
अशा परिस्थितीत पायपीट करुन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रापर्यत पोहचावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत या भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
या भागातील नागरिकांना सहज व सुलभरीत्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी कोठार (ता.तळोदा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती होणे अत्यावश्यक झाले आहे.अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांची देखील येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी आहे. कोठार येथे आरोग्य केंद्र निर्माण झाल्यास परिसरातील सुमारे पाच ते सात हजार सहज व सुलभरीत्या वैद्यकीय सोयीसुविधा मिळण्यास मदत होईल.
याशिवाय परिसरातील आश्रमशाळांमध्ये निवासी शिक्षण घेणार्या सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांना देखिल तात्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.केवळ तळोदा तालुक्यातील नव्हे तर धडगांव तालुक्यातील नागरिकांना देखील कोठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील रूग्णांना व अपघातांतील जखमींना कोठार येथे आरोग्य केंद्राची निर्मिती झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे कोठार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाकडून मागवून योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.