रुग्णवाहिकेला अपघात, १२ गरोदर महिलांसह चालक जखमी

शहादा येथून सोनोग्राफी करुन परततांना लोणखेडा येथे झाला अपघात
रुग्णवाहिकेला अपघात, १२ गरोदर महिलांसह चालक जखमी

शहादा | ता.प्र.- SHAHADA

शहादा येथून सोनोग्राफी (Sonography) करून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे परत जात असताना भरधाव वेगातील शासकीय रुग्णवाहिकेच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वहन पलटी होवून झालेल्या अपघातात १२ गरोदर माता व चालक असे १३ जण जखमी झाले. आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयालगत ही घटना घडली. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील १३ गरोदर महिला सोनोग्राफी (Sonography) करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका १०२ ने (क्र.ए.डी/१५४४) सकाळी शहादा येथील सोनोग्राफी केंद्रात (Sonography Center) आल्या होत्या.

सोनोग्राफी (Sonography) करून या गरोदर महिला सायंकाळी साडेचार वाजता परत तेलखेडी येथे जात असताना लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयालगत खेतिया रस्त्यावर भरधाव वेगातील रुग्णवाहिकेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाल्याने अपघात झाला.

या अपघातात १२ गरोदर महिला व चालक असे १३ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात आ.राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांनी आमदारांच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना नुकत्याच सुरू झालेल्या शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आ.राजेश पाडवी यांनी मोबाईलवरून ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद शेल्टे यांच्याशी संपर्क साधून जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती घेतली. योग्य उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com