जि.प.च्या बांधकाम व अर्थ सभापतीपदी ॲड.राम रघुवंशी

गणेश पराडकेंकडे कृषी व पशुसंवर्धन तर अजित नाईक यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समिती
जि.प.च्या बांधकाम व अर्थ सभापतीपदी ॲड.राम रघुवंशी
USER

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जि.प.च्या रिक्त विषय समिती सभापतींना प्रभार सोपविणे तसेच विषय समित्यांवर रिक्त झालेल्या सदस्यांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्याकडे बांधकाम व अर्थ समिती, गणेश पराडकेंकडे कृषी व पशुसंवर्धन तर अजित नाईक यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जिल्हा परिेषदेतील ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होतेे. यामध्ये तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील तसेच उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती ॲड.राम रघुवंशी यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात निवडणूक पार पडल्यानंतर उपाध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी यांची पुन्हा निवड करण्यात आली होती.

तर दोन विषय समिती सभापती व विविध समितींमधील सदस्यांची पदे रिक्त होती. यामुळे जि.प.च्या याहामोगी सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, नवनियुक्त सभापती अजित नाईक, गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.

यावेळी अर्थ व बांधकाम सभापतीपदी ऍड.राम रघुवंशी, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी गणेश पराडके तर शिक्षण व आरोग्य सभापतीपदी अजित नाईक यांची निवड करण्यात आली. तर स्थायी समितीच्या रिक्त सदस्यांमध्ये गिताबाई पाडवी, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या रिक्त जागेवर शकुंतला शिंत्रे व हेमलता शितोळे, समाजकल्याण समितीच्या रिक्त असणार्‍या तीन जागांवर हेमलता शितोळे, सुरैय्याबी मक्राणी व जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली.

तसेच शिक्षण व क्रीडा समितीवर सुरैय्या मक्राणी व जागृती मोरे यांची निवड करण्यात आली. तर बांधकाम समितीतील रिक्त दोन सदस्यांच्या जागेवर जागृती मोरे व मोहन शेवाळे तर अर्थ समितीवर शकुंतला शिंत्रे, सुप्रिया गावित व एैश्वर्या रावल यांची निवड करण्यात आली आहे. विविध विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडीनंतर सभेचा समारोप झाल्याचे वर्षा फडोळ यांनी जाहीर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com