सातपुडयात आमसूल तयार करण्याची लगबग

मध्यप्रदेश, दिल्लीसह उत्तर प्रदेशात मोठया प्रमाणावर मागणी, आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार!
सातपुडयात आमसूल तयार करण्याची लगबग

रविंद्र वळवी

मोलगी | दि.१६- MOLAGI

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तोरणमाळ परिसरात आदिवासी बांधवांकडून शेतीसोबत आंब्याच्या झाडांची (mango trees) लागवड करण्यात येते. उन्हाळ्यात आंब्यांच्या कच्च्या कैर्‍यापासून आमसूल तयार करून विक्री केली जाते. सोमवारच्या आठवडी बाजारात आदिवासी बांधव आमसूल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. त्यामुळे सध्या मोलगी परिसरात आमसूल तयार करण्याची लगबग सुरु आहे. येथे तयार करण्यात आलेले आमसूल इंदोर, दिल्ली, जयपूर येथील व्यापार्‍यांकडून खरेदी केले जातात तसेच उत्तर प्रदेशात मोठया प्रमाणावर मागणी असल्याने त्या ठिकाणी निर्यात केले जाते.

कोरोनाच्या पार्श्‍वभ्ाुमीवर गेल्या दोन वर्षात आमसूल तयार करून विक्रीची प्रक्रिया काही अंशी मंदावली होती. परंतु यंदा दोन वर्षाचे नुकसान भरून निघेल असा चांगला दर मिळत असल्याने सातपुड्यात आदिवासी बांधवांकडून कच्च्या कैर्‍यापासून आमसूल तयार करण्याची लगबग सुरू आहे.

कच्च्या कैर्‍यांपासून आंबा सोलून बारीक तुकडे करून उन्हामध्ये वाळवून विक्रीसाठी आणलेल्या आमसूलला १६० ते २०० रुपये पर्यंत प्रति किलो दर मिळत आहे.

सातपुड्यातील आमसुल खरेदी स्थानिक व्यापारी तसेच इंदोर, जयपूर येथील व्यापार्‍यांकडून खरेदी केली जात आहे. धडगाव येथे खरेदी केलेले आमसूल दिल्ली, जयपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी निर्यात केले जाते.

सातपुड्यातील आमसूलला उत्तर भारतात मोठी मागणी असून आमसूलपासून विविध मसाल्याचे पदार्थ औषधे बनवले जातात. यंदा उशिराने सुरू झालेला आमसूलचा व्यवसाय आणखी १५ ते २० दिवस सुरू राहणार आहे.

सातपुड्यातील आदिवासी बांधवांना आणखी चांगला दर मिळावा यासाठी गेल्यावर्षी अक्राणीचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी आमसूलसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याची घोषणा केली होती.

परंतु अद्याप कोणताही प्रक्रिया उद्योग अर्थात पावडर बनवण्याचा कारखाना तयार झालेला नाही. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती देऊन लवकर प्रक्रिया उद्योग उभारावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

* आमसूलने सजली धडगावची बाजारपेठ...

* कच्च्या कैर्‍या पासून तयार केलेली आमसूल दिल्ली, जयपूर रवाना...

* यंदा दर चांगला मिळत असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध...

* आमसूल प्रक्रिया उद्योगाची योजना मात्र कागदावरच...

* यंदा आवक कमी मात्र दर प्रतिकिलो २८० रुपये

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com