महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढविणारा तर भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढविणारा तर भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
USER

राकेश कलाल

नंदुरबार Nandurbar।

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) 11 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीचा (By-election) निकाल महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढविणारा तर भाजपाला (BJP) आत्मचिंतन करायला लावणारा आहे. या निकालाच्या अनुषंगाने भाजपातील अंतर्गत गटबाजीबाबत (Factionalism) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या निमित्ताने गावित परिवारातील चौथा सदस्य राजकारणात आला आहे.

ओबीसी संवर्गातील 11 जि.प.सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या 11 सदस्यांमध्ये भाजपाचे 7, तर काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी 2 सदस्यांचा समावेश होता. यासाठी काल दि.5 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या आज निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाचे अवलोकन केले असता 11 पैकी चार जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ तीनने कमी झाले आहे. घटलेले हे तीनचे संख्याबळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील कोळदे, कोपर्ली, खोंडामळी, रनाळे व मांडळ पाच गटांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यापुर्वी कोपर्ली, रनाळे हे दोन्ही गट शिवसेनेकडे होते. ते कायम राखले आहेत. परंतू शनिमांडळ हा गट भाजपाकडून शिवसेनेकडे आला आहे. तर कोळदा व खोंडामळी हे गट राखण्यात भाजपाला यश आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील कोळदा व कोपर्ली हे दोन्ही गट प्रतिष्ठेचे होते. कारण या गटात भाजपाचे आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या तर खा.डॉ.हीना गावित यांच्या भगिनी सुप्रिया गावित या उमेदवार होत्या. तसेच कोपर्ली गटात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड.राम रघुवंशी होते. त्यांच्याविरुद्ध आ.डॉ.गावित यांचे पुतणे तथा पं.स.सभापती प्रकाश गावित यांचे पूत्र पंकज गावित हे उमेदवार होते. त्यामुळे हे दोन्ही गट गावित परिवाराच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे होते. कोपर्ली गट माजी आ.रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता. दोघा नेत्यांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळविले असले तरी आ.डॉ.गावित यांचे पुतणे पराभूत झाल्याने गावितांच्या प्रतिष्ठेला काहीसा धक्का पोहचला आहे.

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. यापुर्वी जिल्हयात शिवसेना ही केवळ अस्तित्वासाठी लढत देत होती. परंतू आता शिवसेना थेट सत्तेत सहभागी आहे. ही किमया श्री.रघुवंशी यांनी करुन दाखविली आहे.

शहादा तालुक्यात चार गटांसाठी निवडणूक घेण्यात आली. यापुर्वी लोणखेडा हा गट भाजपाकडे होता. तो राखण्यात भाजपाला यश आले असून जयश्री दीपक पाटील या पुन्हा या निवडणूकीत विजयी झाल्या आहेत. पाडळदा गट यापुर्वी भाजपाच्या ताब्यात होता. मात्र, आता हा गट राष्ट्रवादीकडे आला आहे. या गटात राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे हे निवडून आले आहेत. म्हसावद गट यापुर्वीही काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यात अभिजीत पाटील निवडून आले होते. आता त्यांच्या जागेवर हेमलता शितोळे या काँग्रेसकडून विजयी झाल्याने काँग्रेसने या गटावर वर्चस्व कायम राखले आहे. कहाटूळ हा गट यापुर्वी काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, आता या गटावर भाजपाने वर्चस्व सिद्ध केले असून ऐश्वर्या जयपालसिंह रावल या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला शहादा तालुक्यात एका जागेवर फटका बसला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा व खापर या दोन्ही गटांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहेत. यापुर्वी हे दोन्ही गट भाजपाच्या ताब्यात होते. मात्र, आता दोन्ही काँग्रेसकडे आले आहेत. खापर गटात आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी या उमेदवार होत्या. त्यामुळे ना.पाडवी यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची होती. त्यांच्यासमोर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी होते. त्यामुळे भाजपासाठीदेखील ही लढत प्रतिष्ठेची होती. परंतू या प्रतिष्ठेच्या लढतीत ना.पाडवी यांनी बाजी मारली असून अक्कलकुवा तालुक्यात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या निकालाचे अवलोकन केले असता महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा आत्मविश्वास वाढविणारा तर भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.

यानिमित्ताने भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गावित परिवारातील दोन सदस्य नंदुरबार तालुक्यातील पाचपैकी 2 गटांमध्ये उमेदवार होते. त्यामुळे नंदुरबार तालुक्यात त्यांचे विशेष लक्ष होते. दुसरीकडे शहादा तालुक्यात भाजपाने एक जागा गमावली असली दोन गटांवर विजय मिळविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणूकीत शहादा तालुक्यातून मोहन शेवाळे यांच्या रुपाने एक जागा बोनस मिळाली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत पाटील यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील भाजपाच्या ताब्यातील दोन्ही गटांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपाला 11 पैकी तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे. या निकालाचा परिणाम आगामी सर्वच निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

गावित परिवारातील चौथा सदस्य राजकारणात

या निवडणूकीत सुरुवातीपासून नंदुरबार तालुक्यातील कोळदे हा गट लक्षवेधी ठरला होता. या गटात आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या तर खा.डॉ.हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित या उमेदवार होत्या. यात त्या विजयी झाल्याने गावित परिवारातील चौथा सदस्य राजकारणात आला आहे. डॉ.गावित हे आमदार असून, डॉ.हीना गावित या खासदार आहेत. डॉ.गावित यांच्या पत्नी सौ.कुमुदिनी गावित या जि.प.सदस्या आहेत. आणि आता डॉ.सुप्रिया गावित या जि.प.सदस्या म्हणून राजकारणात आल्या आहेत. याशिवाय डॉ.गावित यांच्या पुतण्या तथा माजी आ.शरद गावित यांच्या कन्या अर्चना गावित, राजश्री गावित, डॉ.गावित यांच्या वहिनी तथा प्रकाश गावित यांच्या पत्नी या जि.प.सदस्या आहेत. प्रकाश गावित स्वतः पं.स.सभापती आहेत. त्यामुळे गावित परिवारातील 5 जण जि.प.सदस्य आहेत, हे विशेष!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com