दोन हजाराची लाच स्विकारणार्या पं.स.तील कनिष्ठ सहाय्यकाला अटक
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
महागाई भत्त्याचा फरक व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच स्विकारणार्या नंदुरबार पंचायत समितीतील (Nandurbar Panchayat Samiti) शिक्षण विभागातील (Department of Education) कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (acb) रंगेहाथ अटक केली.
यातील तक्रारदार यांचा जानेवारी २०२२ पासूनचा ३ टक्के महागाई भत्त्याचा फरक व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे याने लाचेची मागणी केली.
३ टक्के महागाई भत्त्याच्या फरकासाठी ३ हजार व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याच्या बिलासाठी २ हजार रुपये असे एकुण ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ हजार रुपये लाचेची रक्कम आज दि.१४ ऑक्टोबर रोजी पंचसाक्षीदारांसमक्ष पंचायत समितीच्या कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या चहाच्या दुकानावर स्विकारतांना निकवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोना अमोल मराठे, मनोज अहिरे, देवराम गावित, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, चालक पोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.