रामपूरच्या घरकुल घोटाळ्याची होणार उच्चस्तरीय चौकशी

आ.आमश्या पाडवी यांच्या तक्रारीची दखल
रामपूरच्या घरकुल घोटाळ्याची होणार उच्चस्तरीय चौकशी

मोलगी molgi । वार्ताहर-

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे झालेल्या घरकुल घोटाळ्याची (Gharkul Scam) व संबंधित प्रकरणात दोषींना पाठीशी घालणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची (senior officials) तसेच इतरांच्या भ्रष्ट कारभाराची उच्चस्तरीय चौकशी (High level inquiry) करण्याचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) यांनी दिले आहेत. आ.आमश्या पाडवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर आदेश देण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील घरकूल घोटाळ्यात बुडालेल्या अधिकार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभय देऊन त्यांच्या कृतीकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी अशिक्षित लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला. याबाबत आ.आमश्या पाडवी यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. रामपूर येथील घरकुल अनुदान वाटप करतांना मूळ लाभार्थ्यांची यादी बदलून तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी अक्कलकुवा पंचायत समितीतील इतर अधिकार्‍यांसमवेत संगनमत करुन इतर व्यक्तींची नावे त्यात समाविष्ट केली व त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली. ही बाब आ.आमश्या पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तक्रार अर्जाच्या माध्यमातून 9 जुलै 2020 रोजी निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने प्रस्तावित झालेल्या चौकशीअंती आ.पाडवी यांनी निदर्शनास आणून दिलेली बाब खरी असून अनियमितता झाली असल्याचे सिद्ध झाले.

इतर व्यक्तींच्या नावे जमा झालेली रक्कम ही मूळ लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत न देता संबंधित लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व काही कनिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आल्याचे तक्रार केल्या तारखेपासून सुमारे 2.5 वर्षानंतर आ.पाडवी यांना दि.31 जानेवारी 2023 रोजी अवगत करण्यात आले. परंतु या सर्व प्रक्रियेत लाभार्थी यादी फेरफार करणारे ग्रुप ग्रामपंचायत रामपूर येथील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिली व कार्यवाहीत होत असलेल्या दिरंगाईबाबत देखील अवगत केले. परंतु त्यांनी या विषयाकडे कोणत्याही गांभीर्याने न बघता चालढकल केली.

अतिदुर्गम भागातील गरीब आदिवासी लाभार्थ्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांना अनुज्ञेय असलेले घरकुल अनुदानाची यादी बदलून इतर तोतया व्यक्तींची नावे टाकून अनुदान लाटू पाहणार्‍या व सुमारे 2.5 वर्ष मूळ लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणारे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक तसेच इतर अधिकार्‍यांवर दोष सिद्ध होऊनदेखील फौजदारी व आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ चालढकल केली. तसेच अक्कलकुवा पंचायत समितीमधील तत्कालीन गटविकास अधिकारी सी.के.माळी, नंदकिशोर सुर्यवंशी व आता कार्यरत असलेले महेश पोतदार यांनीदेखील या कृतीकडे पुर्णतः दुर्लक्ष केले. त्या अनुषंगाने आ.आमश्या पाडवी यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन अतिरिक्त मुख्य सचिव यांनी रामपूर घरकुल घोटाळा तसेच इतर व्यवहारांबाबत संबंधित अधिकारी व इतरांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आ.आमश्या पाडवी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com