बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यापार्‍याला लुटणारी टोळी जेरबंद

६ जणांना अटक, ९ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यापार्‍याला लुटणारी टोळी जेरबंद

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यापार्‍याला लुटणारी टोळी पोलीसांनी जेरबंद केली असून ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, गुन्हयात वापरण्यात आलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास वळवद ते उमर्दे दरम्यान म्हशींच्या तबेल्याजवळ रोडवर रुपेश सुमनलाल सोनार (रा.नंदुरबार) हे कोपर्ली येथील सोने चांदी विक्रीचे दुकान बंद करुन त्यांच्या मित्रासह त्यांची इंडीगो सी.एस. कार (क्रमांक एमएच-१८ डब्ल्यू-३६१४) ने नंदुरबारला येत असतांना

त्यांच्या गाडीच्या पुढे इनोव्हा गाडी आडवी लावून सोनार व त्यांच्या मित्रांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून ९ लाख ७६ हजार ७२० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतला होता.

याबाबत रुपेश सोनार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९४, ३४१, ३४ सह आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या.

नाकाबंदीदरम्यान अज्ञात आरोपीतांच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाणे, धुळे येथे देखील नाकाबंदी लावण्यात आलेली असल्याने आरोपीतांनी वाहन पुन्हा मागे फिरवून आखाडे गावाच्या दिशेने घेतले.

रात्रीची वेळ असल्याने आरोपीतांनी वाहन शेतात सोडून दिले व आरोपी सदर ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपी सोडून गेलेल्या वाहनाची पोलीसांनी पाहणी केली असता वाहनामध्ये आरोपीतांनी रुपेश सुमनलाल सोनार यांच्याकडून जबरीने हिसकावलेले ९ लाख ७६ हजार ७२० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने, रोख रुपये, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी इनोव्हा वाहन व बंदुक पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतली.

गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेला मुद्देमाल पोलीसांना हस्तगत करण्यात यश आले होते. मात्र चोरटयांच्या शोधासाठी पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे ६ वेगवेगळे पथके तयार केले.

ताब्यात घेतलेल्या वाहनामध्ये अनेक महत्वाचे पुरावे पोलीसांच्या हाती लागले. त्यामुळे पोलीसांना पुढील तपासासाठी गती मिळाली. आरोपी हे धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले होते.

दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी पी.आर.पाटील यांना वळवद ते उमर्दे दरम्यान म्हशींच्या तबेल्याजवळ झालेल्या घटनेतील आरोपी हे धुळे व नंदुरबार येथील असून त्यांना नंदुरबार येथील ५ ते ६ संशयीतांनी मदत केली असल्याची अशी माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने खोडाई माता रोड व चिंचपाडा भिलाटी परिसरातून पावबा भिकन आखाडे (वय-२६ रा. सिंदगव्हाण ता.जि.नंदुरबार)व दिपक शाम ठाकरे (वय-२१ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) यांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता पावबा आखाडे याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दिपक ठाकरे, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बॉबी बैसाणे सर्व रा. नंदुरबार अशांनी घटनेच्या दोन दिवसाआधी कट रचून धुळे येथील मनोज पारेराव याच्या सांगण्यावरून सत्तार मेंटल, वसिम बाटला, बापू, पप्पू व अनोळखी एक इसम सर्व रा. धुळे असे सर्वांनी मिळून केल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे नंदुरबार येथील गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दिपक ठाकरे, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बॉबी बैसाणे यांचा शोध घेतला असता ते बदलापूर जि. ठाणे येथे पळून गेल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ बदलापूरला रवाना करण्यात आले.

आज दि.२१ रोजी बदलापूर येथून स्थानिक पोलीसांच्या मदतीने गोविंदा यशवंत सामुद्रे, मुकेश शामा ठाकरे, विकास ऊर्फ नागू अशोक ठाकरे, विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश वसावे पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे, राकेश मोरे, मनोज नाईक, सुनिल पाडवी, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे, राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com