नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी

शहरातील पटेलवाडी परिसरात झालेली 9 लाख रुपयांची घरफोडी (house burglary) फिर्यादीनेच केल्याची बाब उघडकीस (solved) आली आहे. त्याच्याकडून संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस (police) ठाण्याची पथकानेही ही कारवाई केली आहे.

दि.2 ते 4 मे दरम्यान शेख युसुफ शेख चांद (वय53,रा.प्लॉट नंबर-115 पटेलवाडी, नंदुरबार) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने घरातील कपाटामधून 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्याचवेळी श्री. शेख युसुफ शेख चांद यांच्या घरात भाडेकरु म्हणून 3 वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

श्री. जुबेर शहा यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची श्री.पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा यांना काही प्रश्न विचारण्यात आले असता, ते घरात चोरी झाल्याचा बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन श्री. जुबेर शहा यास सखोल विचारपूस करण्याचे आदेश दिले.

पथकांनी जुबेर इब्राहीम शहा विचारपुस केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर मात्र त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याच घरातून काढुन दिला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com