तळोदा पालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सत्ताधारी ८ नगरसेवक गैरहजर

दोन विषय समित्या अवैध ठरल्या, राजकीय वर्तुळात खमंग चर्चा
तळोदा पालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सत्ताधारी ८ नगरसेवक गैरहजर

मोदलपाडा/सोमावल | वार्ताहर- TALODA

तळोदा नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापती व सदस्य निवडीसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. मात्र, सभेला सत्ताधारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह भाजपाचे ८ नगरसेवक गैरहजर होते. परिणामतः २ विषय समित्या या अवैध ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरु आहे.

तळोदा पालिकेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते. सभेच्या पीठासीन अधिकारी म्हाून तहसीलदार गिरीश वखारे उपस्थित होते. भाजपाचे गटनेते भास्कर मराठे व नगरसेविका सूनयना उदासी केवळ दोनच सदस्य उपस्थित होते.

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षसह नगरसेवक हे विषय समित्यांच्या निवडीच्या विशेष सभेला गैरहजर असल्याने नगरपालिकेच्या दोन विषय समित्या या अवैध ठरल्या.

त्यामुळे दोन विषय समित्यांच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे उत्सुकता लागून आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्या दृष्टिने या समित्यांची शेवटची निवड होती.

तळोदा शहरात १ वर्षावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतांना भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा व नगरसेवक हे सभेला गैरहजर असल्याने तापलेल्या राजकीय वातावरणाला सत्ताधार्‍यांनी या सभेला गैरहजर राहून अधिकच तापवल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

पालिकेच्या सत्ताधार्‍यांमध्ये विषय समित्यांवरून सभेपुर्वीच एकमत नव्हते. सत्ताधार्‍यांना विषय समित्या या आपल्या हातातून जातील अशी भीती होतीच.

त्यामुळे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी गिरीश वखारे यांना विषय समित्यांच्या निवडीसाठी घेण्यात येणारी विशेष सभा ही तहकूब करण्याची विनंती केली होती. परंतु तशी तरतूद नसल्याने ही मागणी तहसीलदारांनी फेटाळून लावली.

पालिकेतील आमच्या सत्ताधार्‍यांचे गटनेते भास्कर मराठे हे आमच्या सोबत नसल्याने विषय समित्यांवर एकमत झाले नव्हते. तसेच काही नगरसेवकांना कोरोनाची लक्षणे होती. ते नगरसेवक आर टी पी सी आर चाचणी करणार होते. त्यामुळे पूर्व सावधानता म्हणून विशेष सभेला गैरहजर राहणेच आमच्या दृष्टिने योग्य होते. या विशेष सभेला स्थगिती मिळावी म्हणून आम्ही भाजपाचे सर्व नगरसेवक जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार आहोत.

अजय परदेशी, नगराध्यक्ष,न.पा.तळोदा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com