धडगाव येथे सव्वा लाखाच्या २० तलवारी जप्त

जि.प.,पं.स. पोटनिवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
धडगाव येथे सव्वा लाखाच्या २० तलवारी जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

धडगाव (Dhadgaon) येथे औजारांच्या टपरीत बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगणार्‍या एकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपये किमतीच्या २० तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. (LCB) स्थानिक गुुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-२०२१ व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनीदेखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजार विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली.

त्यानुसार त्यांंनी स्थानिक गुन्हे शाखे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ धडगांव येथे रवाना केले. धडगाव गावातील मुख्य रस्त्यावर एक इसम पत्र्याच्या टपरी बाहेर संशयास्पद हालचाली करतांना पथकाला दिसून आला.

म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. संजय कागडा वळवी (वय ३८, रा.कात्री ता.धडगाव) असे या ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्या टपरीची झडती घेतली असता

तेथे १ लाख २८ हजार रुपये किमतीची २० लहान मोठ्या धारदार तलवारी मिळून आल्याने संजय कागडा वळवी याच्याविरुध्द धडगांव पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नंदुरबार जिल्हा पोलीसांनी दिला आहे.

सदर कारवाइ पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत दिपक न्हावी, रमेश साळुके यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com