रनिंग करत असतांना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

धनराट आश्रमशाळेतील घटना
रनिंग करत असतांना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

तालुक्यातील धनराट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याचा सकाळी रनिंग करत असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार अंतर्गत धनराट ता.नवापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सोळा वर्षीय विद्यार्थी भाऊ करज्या गावित (रा.भवरे ता.नवापूर) हा आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास पटांगणात रनिंग करताना अचानक चक्कर येऊन खाली पडला.

शालेय प्रशासनाने तात्काळ विद्यार्थ्याला आश्रमशाळेतील १०८ रुग्णवाहिकेतून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्याने नातेवाईकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात व धनराट शासकीय आश्रमशाळेत मोठी गर्दी केली व आईवडिलांनी आक्रोश केला.

मयत विद्यार्थी भाऊ करज्या गावित (वय १६) हा भवरे ता.नवापूर येथील रहिवाशी आहे. करज्या मोना गावीत यांना ६ मुले आहेत. भाऊ गावित हा ४ नंबरचा मुलगा होता. ५ नंबरचा मुलगा देखील धनराट शासकीय आश्रमशाळेत शिकत आहे.

अचानक मृत्यू झाल्याने गावित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागाच्या नियमानुसार तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर भवरे या गावी विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास नवापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, पोहेकॉ गणेश बच्छे, कैलास तावडे, नरेंद्र नाईक, नितिन नाईक करीत आहेत.

Related Stories

No stories found.