
मोलगी | वार्ताहर- MOLAGI
सातपुड्यातील (Satpura Mountains) खुर्चीमाळ परिसरातील डोंगरदरीत आज दुपारी ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. दरम्यान, डोंगर माथ्यावर चरायला गेलेल्या बकर्यांवर वीज कोसळून १६ बकर्या जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सुदैवाने बकर्या (Goats) चरावयास गेलेली मुलगी व एक इसम थोडक्यात बचावले.
अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यात सध्या परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान होत आहे. खुर्चीमाळ येथील पिंकी सेगा नाईक व शांताराम काल्ला नाईक हे सकाळी खुर्चीमाळ येथील उंबराई पाड्यां कडील डोंगरावर बकर्यां चरावयास घेऊन गेले होते.
आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास उंबराईपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.त्यामुळे पावसापासुन बचाव करण्यासाठी बकर्यांचा एक कळप डोंगरावरील पिंपळाच्या झाडाजवळ उभे होते.
यावेळी डोंगरदर्यात वीज बकर्यांवर कोसळली. त्यात खुर्चीमाळ येथील सायसिंग चांदया नाईक यांची १, काल्ला सुरजी नाईक यांच्या ५, चांदया टेंबर्या नाईक यांच्या ३ तर हांदया उंबर्या नाईक यांच्या ७ अशा एकुण १६ बकर्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. सुदैवाने बकर्या चरावयास घेऊन जाणारी पिंकी नाईक ही मुलगी लांब अंतरावर होती. त्यामुळे ती थोडक्यात बचावली.