
नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी भेट म्हणून देण्यात आलेल्या २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी १०० यंत्र भारतीय जैन संघाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.भारुड म्हणाले, कोरोनामुळे देशभरात मोठे संकट उभे असून त्याविरुद्ध एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. भारतीय जैन संघ आणि ओसवाल परिवाराने २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन संकटाच्या प्रसंगी प्रशासनाला मौलिक सहकार्य केले आहे.
या कुटुंबाचे कार्य नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे
ऑक्सिजन पातळी ९० ते ९५ दरम्यान असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपयुक्त आहेत.
प्रशासनातर्फेदेखील आणखी २८० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार असून ऑक्सिजन सिलेंडर पोहोचू न शकणार्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात ते उपलब्ध करून देण्यात येतील.
कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण महत्वाचे असून जिल्ह्यात १८ वर्षावरील साधारण १२ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्यदेखील आवश्यक आहे. नागरिकांनी ग्रामीण भागात होणार्या शिबिरात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
खा.डॉ.गावीत म्हणाल्या, भारतीय जैन संघाने जिल्ह्यासाठी चांगले योगदान दिले आहे. कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली मदत जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. केवळ ऑक्सिजनमुळे बरे होऊ शकणार्या दुर्गम भागातील जनतेला या यंत्रांचा उपयोग होणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसोबत देण्यात येणारी रुग्णवाहिकादेखील ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. ओसवाल कुटुंबियांना त्यांनी जिल्ह्याच्यावतीने धन्यवाद दिले.
गौतम जैन म्हणाले, विमलादेवी यांनी जिल्हयासाठी मदत देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून २५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि एक रुग्णवाहिका जिल्हयासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरीत यंत्र व रुग्णवाहिका लवकरच प्रशानाला उपलब्ध करून देण्यात येईल. दुर्गम आणि ग्रामीण भागात या यंत्रांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री.गावडे, डॉ.कांतीलाल टाटीया, रमाकांत पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ.टाटीया यांनी बीजेएसच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक सत्कार केला.
डॉ.राहूल वसावे यांनी यंत्राबाबत माहिती दिली. कार्यमक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महेश सुधळकर, तहसीलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, सुरेश तातेड, विजूभाई तातेड, लोणचंद तातेड,देवेंद्र तातेड आदी उपस्थित होते.