२० वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कोपर्ली येथील घटना
२० वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे घडली.

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल विठ्ठल चौधरी यांचे चिंरजीव शुभम हिरालाल चौधरी यांचे शिक्षण नंदुरबार, शिरपूर तसेच नांदेड येथे झाले. शिक्षणासाठी ते बाहेरच असल्यामुळे त्यांचा गावाशी जास्त संपर्क नव्हता.

मात्र कोरोना काळामुळे दोन वर्षांपासून ते कोपर्ली येथे वास्तव्यास होते. शुभम चौधरी हा पुढील शिक्षणासाठी शिरपूर येथे बीईएमएससाठी शिरपूर येथे जाणार होते.

त्यासाठी आज दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान कपडे प्रेस करण्यासाठी कोपर्ली गावातील धोबीकडे गेले असता त्या घरासमोर एका घरात लोखंडी दरवाज्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्या घरात राहणार्‍या सविता योगेश पवार (गोंधळी) (वय २७) या महिलेला विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने त्या दरवाजाला चिटकल्या. हे शुभम चौधरी यांच्या लक्षात आल्याने ते सदर महिलेच्या मदतीसाठी धावले.

दरम्यान, यावेळी नागरीकांनी त्या दरवाज्यात विद्युत प्रवाह उतरलेला आहे असे सांगितले. मात्र शुभम चौधरी यांनी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता त्या महिलेला वाचविण्यासाठी तेथे धाव घेत त्या महिलेला खेचले.

या दरम्यान या दरवाज्याला शुभम हिरालाल चौधरी (२७) हे चिटकले. त्यामुळे नागरीकांनी शुभम चौधरी यांना कोपर्ली गावातील आरोग्य केंद्रात नेले.

मात्र त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने शुभम याला नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुभम चौधरी याचे शवविच्छेदन करून त्याच्या कुटूंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

दरम्यान सविता योगेश पवार या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुभम चौधरी याचा मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

आज दि.२४ नोव्हेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे सदर घटना घडत असतांना फरीद पिंजारी यांनी याबाबतची सूचना विद्युत वितरण कंपनीला तीनदा फोन करून कळवूनही विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला नाही.

विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडीत केला गेला असता तर कदाचीत युवकाचे प्राण वाचले असते. त्यामुळे नागरीकांनी विद्युत वितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com