
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांपासून कुपोषित बालकांची (Malnourished child) संख्या वाढत असून गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आणखी त्यात भर पडली होती. वाढत्या कुपोषित बालकांमुळे जळगाव जिल्हाही इतर नंदुरबार,गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे कुपोषिेत श्रेणीमध्ये आला होता. मात्र, सीईओ डॉ.पंकज आशिया (CEO Dr. Pankaj Asia) यांनी कुपोषणावर उपाय म्हणून शोधलेली दत्तक योजनेचा (Adoption plan) उपाय खरोखरच वरदान ठरली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांंना कुपोषित बालके दत्तक देऊन त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे 2 हजार बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर आली आहे. आता दत्तक योजनेमुळे जिल्हा कुपोषणमुक्तीकडे (Towards freedom from malnutrition) वाटचाल करीत आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात 3 हजारांच्यावर अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या आढळून आली होती. त्यामुळे जिल्हा हादराला होता. महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या विशेष शोध मोहिमेमुळे कुपोषित बालकांची 1 हजारावर संख्या घटली आहे. आता 2 हजार 637 अतितीव्र कुपोषित बालकांपैकी 1949 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते अतिकुपोषित या श्रेणीतून बाहेर आले आहेत.
कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना या कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी महिला व बालविकास तसेच आरोग्य यंत्रणा यांच्या एकत्रितपणे ही सुंयक्त मोहीम प्रभावीपणे हाती घेतली होती. दोन्ही यंत्रणाच्या एकत्रित शोध मोहिमेतून कुपोषित बालकांची संख्या समोर आली होती. जिल्ह्यात एकूण 3 हजार 641 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 1 हजार 383 अंगणवाड्यांमध्ये सॅम प्रकारातील कुपोषित बालके आहेत. 1 हजार 949 बालके या श्रेणीतून बाहेर आल्यानंतर आता 688 बालके अतितिव्र कुपोषित या श्रेणीत आहेत.
जि.प.प्रशासनाने दत्तक पालक योजनेत 1 हजार 678 बालकांना दत्तक दिले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली आहे. मॅम प्रकारातील श्रेणीत 10 हजार 537 बालकांचा समावेश होता. त्यांनी 6 हजार 712 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन मॅमश्रेणीमधून नॉर्मल श्रेणीत गेली आहेत. सध्या जिल्ह्यात 3 हजार 825 बालके मॅम प्रकाराचे कुपोषित आहेत. जि.प.प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे दत्तक योजना प्रभावी ठरली आहे.
दर महिन्याला कुपोषित बालकांचा शोध घेणार
महिला व बालविकास विभागाने कुपोषणमुक्तीचा संकल्प केला आहे. कुपोषित बालकांच्या दत्तक योजनेतून मिळालेल्या यशामुळे हा संकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. दर महिन्याला कुपोषित बालकांचा शोध घेतला जाणार आहे. महिला व बालविकास आणि आरोग्य विभाग अशी संयुक्तपणे ही मोहीम एकत्रितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी दिली.