जिल्हा परिषदेच्या 142 कर्मचार्‍यांची झाली खांदेपालट

सोयीच्या बदल्यांसाठी कर्मचार्‍यांनी घेतला ताई-भाऊंच्या शिफारशींचा आशीर्वाद !
जिल्हा परिषदेच्या 142 कर्मचार्‍यांची झाली खांदेपालट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेतील वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय 10 टक्के व विनंतीनुरुप 10 टक्के बदल्या समुपदेशानाद्वारे करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून छत्रपती शाहू महाराजत सभागृहात सुरु झाली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. जि.प.सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग,पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग आदी विभागातून 142 कर्मचार्‍यांची खांदेपालट केली आहे.

सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी आधीच ताई-भाऊंच्या शिफारशींचा आशीर्वाद घेऊन दोन ते तीन पर्याय दिला असल्याने कर्मचार्‍याची सोयही झाली. त्यामुळे ताई-भाऊंसह जिल्हा परिषद प्रशासनही खुश झाले.

समुपदेशानाद्वारे बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील,जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे,जि.प.सीईओ पंकज आशिया, अतिरिक्त सीईओ कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

यंदा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक पहावयास मिळाला. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लादलेल्या नियमामुळे मे महिन्यातील बदल्यांचे सत्र पुढे ढकलण्यात आले होते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्या 30 जुलैपूर्वी कराव्या, असे आदेश दिल्यानंतर जि.प. प्रशासन कामाला लागले होते.

अशा झाल्यात बदल्या

जिल्हा परिषदेतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात 23 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी 2 विनंती तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी 2 विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

विस्तार अधिकारी (सां.) विनंती 1 तर वरिष्ठ सहाय्यक प्रशासकीय 3 तर विनंती 2, कनिष्ठ सहाय्यक प्रशासकीय 5 तर विनंती 23, आपसी बदली विनंती 2 तर परिचर विनंती 26 जणांच्या बदल्या केल्या.

ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी प्रशासकीय 1, ग्रामविकास अधिकारी विनंती 6, ग्रामसेवक प्रशासकीय 7 तर विनंती 22, आपसी बदली विनंती 5, कनिष्ठ लेखाधिकारी प्रशासकीय 1 व विनंती 1, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) प्रशासकीय 1 तर विनंती 2, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) विनंती 1 बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागील पशुधन पर्यवेक्षक विनंती 7 तर व्रणोपचारक 2, आपसी बदली 1, पर्यवेक्षिका प्रशासकीय 1 व विनंती 2, तर कृषी विभागातील कृषी अधिकारी विनंती 1 तर विस्तार कृषी अधिकारी विनंती 1, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता प्रशासकीय 1 व विनंती 6, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विनंती 4, कनिष्ठ अभियंता विनंती 1 तर प्रशासकीय 1, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख विनंती 1 तर विस्तार अधिकारी (शिक्षण) विनंती 1 अशा एकूण प्रशासकीय 20 तर 122 विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

उर्वरित 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 वाजता आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जातील, असे अतिरिक्त सीईओ कमलाकर रणदिवे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com