Yuvarang Youth Festival # लोकनृत्यासह लोकसंगीताला विद्यार्थ्यांनी दिली चालना

आज पारितोषीक वितरणाने समारोप
Yuvarang Youth Festival # लोकनृत्यासह लोकसंगीताला विद्यार्थ्यांनी दिली चालना

अरूण होले

फैजपूर Faizpur

भारतीय लोकनृत्यावर (folk dance) थरकणारी तरूणाई, लोकसंगीतातील (folk music) जोष, शास्त्रीय नृत्यातील पदन्यास,नाटयगीतातील आलाप आणि फाईन आर्टद्वारे साकारलेली कला यामुळे युवारंग युवक महोत्सवातील (Yuvarang Youth Festival) आजचा तिसरा दिवस अविस्मरणीय ठरला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाच्या रविवारी स्पर्धा संपल्या. उद्या सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे.

आज रविवारी सकाळी 10 वाजता स्पर्धांना सुरवात झाली. रंगमंच क्र.1 कै. सुनीतभाई बोंडे रंगमंच वर सहभागी विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले, वारकर्‍यांची दिंडी, आदिवासी नृत्य, पारंपारिक नृत्य, पावरी नृत्य ढोल ताशांच्या तालावर थिरकणार्‍या स्पर्धकांनी उपस्थितांना टाळयांचा कडकडाट करण्यास भाग पाडले. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हती भानात, अन अंबाबाईच वारं माझ्या भरल्या अंगात या समुह नृत्याने सारी तरूणाई जल्लोष करीत राहीली. सार्‍या रंगमंचावर हळदीचं उधळण होत अतिशय शिस्तबध्द पध्दतीने समुहनृत्य करीत सर्व प्रेक्षकांचे मन जिंकली. भलरी, पावरीनृत्य, आदीवासी डोगंरातील गीत, बंजारानृत्य, कोळीनृत्य, ग्रामीण आदीवासी, खंडेरायाच्या लग्नाला, बंजारा लंबाडीया, होळी सण आदी नृत्याचे प्रकार ढोल, नगारा, घुंगरू या वाद्यांच्या सहाय्याने स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विविध पारंपारिक पोषाखातून संस्कृतीचे दर्शन घडताना दिसत होते. समुहनृत्य प्रकार हा सर्वाधिक गर्दी खेचणारा रंगमंच ठरला, शिट्टयांच्या गजरात वन्समोअर ची मागणी प्रेक्षकांमधून होत होती. आदिवासी नृत्य करणार्‍या महिला स्पर्धकांनी आकर्षक पेहराव व त्यावर परिधान केलेली दागिणे हे विशेष आकर्षण ठरले. टाळ मृदुंग, झांज च्या सहाय्याने वारकरी संप्रदायातील नृत्याने परिसर भक्तिमय झालेला दिसून येत होता. प्रत्येक सहभागी स्पर्धक आपली कला जास्तीतजास्त चांगल्याप्रकारे सादर करण्याकरीता प्रयत्नशील होता. या कलाप्रकारात 24 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

रंगमंच क्र.2 कै.व्ही.डी.फिरके रंगमंच वर भारतीय शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात स्पर्धक विद्यार्थ्यांनी ओरिसा, आंध्र, मणिपूर या राज्यातील भरतनाट्यम,कथ्थक, कथकली, कचीपुडी आदी शास्त्रीय नृत्यांचे अव्वल दर्जाचे सादरीकरण केले.

अक्षया, पंचमसवारी, त्रिताल, श्लोक,उठाण, थाट, आमद, तोडे, झपताल आदी नृत्यानुसार भाव बदलणारे प्रकार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या कलाप्रकारात 10 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

दुपारच्या सत्रात या रंगमंचावर भारतीय लोक संगीत वाद्यवृंद कलाप्रकारात महाराष्ट्रातील लोकधारा उपेक्षित लोककला या विषयावर सहभागी स्पर्धकांनी परिसरातील वातावरण मंगलमय केले. बासुरीच्या मधुर वाणीने सकाळची सुरूवात प्रसन्न होते त्यासारखे वातावरण निर्माण केले. त्यानंतर टाळ, मृदुंग, खंजिरी, तुनतुना, व ढोलकीच्या संगीताने मनात भक्तीभाव जागा केला.

शंखाच्या हुंकाराने अध्यात्ममय वातावरण निर्माण झाले. या कलाप्रकारात प्रथमच मोरचंद, रावणहत्ता, राजस्थानी चिमणी, खरतल, पेपा, दुतारा या वाद्यवृंदाचा वापर करण्यात आला. रावणहत्ता हे वाद्यवृंद कोणालाही माहित नाही मात्र जे या क्षेत्राात संशोधक आहेत त्यांनाच या वाद्यवृंदाची माहिती आहे. हे वाद्यवृंद या रंगमंचावर चर्चेचा विषय ठरताना दिसून आले. या कलाप्रकारात 7 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

रंगमंच क्रं.3 कै.घनश्याम काशीराम पाटील रंगमंच वर फोटोग्राफी या कलाप्रकाराची अंतीम फेरी आयोजित करण्यात आली होती. मुड हा फोटोग्राफी कलाप्रकाराचा विषय होता. एकुण 15 स्पर्धक या फेरीसाठी पात्र ठरले होते.

रंगमंच क्र.4 कै.वजीर चांदखा तडवी रंगमंच वर नाटयसंगीत हा कला प्रकार सादर करण्यात आला. या कलाप्रकारात 9 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच या रंगमंच वर मेहंदी या कलाप्रकारात वेस्टर्न या विषयावर 59 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला, विद्यार्थिंनींच्या बरोबरीने विद्यार्थ्यांनी या कलाप्रकारात सहभाग नोंदविलेला दिसून आला. अतिशय सुबक व सुंदर मेहंदी स्पर्धकांनी हातावर मांडल्या होत्या.

रंगमंच क्र.5 कै.बाजीराव नाना पाटील रंगमंच वर पोस्टर मेकिंग या कलाप्रकारात महिला सक्षमीकरण हा विषय देण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक क्षेत्रात नाव उंचावलेल्या महिलांचे सादरीकरण या कलाप्रकारात केलेले दिसून आले.

दुपारच्या सत्रात याच रंगमंचावर रांगोळी कलाप्रकारात फेस्टीवल या विषयावर लक्ष्मीपुजन, दसरा, पोळा, नवरात्र, शिवजयंती, दिवाळी, युवारंग, मकरसंक्रांत, राष्ट्रीय एकात्मता, आषाढी एकादशी, होळी आदी सण-उत्सव अतिशय उत्कृष्ट पध्दतीने रांगोळीद्वारे सादर करण्यात आले. एकुण 60 स्पर्धकांनी या कलाप्रकारात सहभाग नोंदविला.

कोण ठरणार युवारंगचा विजेता ?

युवारंग महोत्सवाचा पारितोषीक वितरण समारंभ सिने नाट्य, कलावंत गौरव मोरे यांच्या हस्ते होईल. यानिमित्ताने कोणाला बक्षीस मिळेल? कोणत्या महाविद्यालयाला घवघवीत यश मिळेल ? याबद्दल मोठी उत्सुकता तरुणाईंमध्ये दिसून येत आहे.

यांची असणार उपस्थिती

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. एस टी इंगळे, प्र.कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे असतील. या पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गुलाबराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ,तर तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर एस. के. चौधरी हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, युवा रंगाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, संचालक विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. एस.बी. कुलकर्णी, कुलसचिव डॉ. व्ही .पी. पाटील, युवा रंगाचे समन्वयक डॉ.एस. व्ही. जाधव, सह समन्वयक डॉ. आर. डी. तळेले, तापी परिषद विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के .चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे ,चेअरमन लिलाधर चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. के .आर .चौधरी, चिटणीस प्रा .एम.टी. फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे, संजय चौधरी, संस्थेचे पदाधिकारी सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, पद्माकर पाटील, यासह विद्यापीठाच्या आदी सभासद सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

हे होते परिक्षक

रंगमंच क्रमांक एक कै .सुमित भाई बोंडे रंगमंचावर भारतीय लोक समूह नृत्य स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सादर केले परीक्षक म्हणून प्रा. डॉ.उत्पल चौधरी, प्रा . डॉ जयश्री नेमाडे. प्रा. दिलीप बोदडे ,प्रा. एस. वाय. पाटील यांनी या मंचाची धुरा सांभाळले रंगमंच क्रमांक दोन कै. व्ही .डी .फिरके या रंगमंचावर भारतीय लोकसंगीत व वाद्य वृंद यांचे सादरीकरण मोठ्या दिमाखात सादर झाले, या रंगमंचाची धुरा प्रा. डॉ. आर. आर. राजपूत यांनी सांभाळली, रंगमंच क्रमांक तीन कै. घनश्याम काशीराम पाटील, या रंगमंचावर छायाचित्र स्पर्धा संपन्न झाली .या रंगमंचांची धुरा प्रा. डॉ .जगदीश खरात यांनी सांभाळली, रंगमंच क्रमांक चार कै. वजीर चांदखा तडवी, या रंगमंचावर नाट्यसंगीत व मेहंदी कला सादर करण्यात आली ,याची धुरा प्रा. डॉ. जगदीश पाटील यांनी सांभाळली, रंगमंच क्रमांक पाच कै. बाजीराव नाना पाटील रंगमंचावर रांगोळी पोस्टर मेकिंग स्पर्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या तल्लीनतेने सादर केल्या ,या रंगमंचाची धुरा प्रा. डॉ .ए .के. पाटील यांनी सांभाळली.

सुमारे तीन हजाराच्यावर स्पर्धक, विद्यार्थी, पाहुणे, परीक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची स्वादिष्ट, रुचकर ,भोजन, व्यवस्था प्रा डॉ .व्ही.सी. बोरले व यांची टीम प्रा .निखिल वायकोळे , प्रा. डॉ. आर .पी. झोपे सह सहकारी यांनी समर्थपणे सांभाळली, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्ततेची भावना व्यक्त करून दाखवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com