वडील अन् मामादेखत तरुणाची विहिरीत उडी

आईसह स्वत:चे आजारपण सोबतच वडिलांना कॅन्सर झाल्याने तणावातून संपविले जीवन
वडील अन् मामादेखत तरुणाची विहिरीत उडी

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यान येथील अनेक वर्षापासूनच्या विहिरीत उडी घेवून आज रविवारी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास इम्रान खान अकिल खान (वय 24) रा. अशोक किराणाजवळ, मेहरुण या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

आई नेहमी आजारी असते, वडीलांचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले तसेच स्वतः डोक्याच्या मायग्रेन आजाराने त्रस्त असल्याने दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या इम्रान याने ताणतणावातून जीवन संपविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

एकुलत्या एक मुलाने मामा अन् वडीलांसमोरच घेतली विहिरीत उडी

गेल्या तीन दिवसांपासून इम्रान हा तणावात होता. आज त्याचे घरी कुटुंबियांशी दोन दोन शब्द झाले. यामुळे टेन्शन आल्याने इम्रान हा आज रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास बाहेर पडला. मेहरुण तलावावर न जाता, मेहरुण परिसरातीलच शिवाजी उद्यान येथे पोहचला. टेन्शनमध्ये असल्याने इम्रानच्या हातून काही चुकीचे पाऊल उचलले जावून दुर्घटना घडू नये म्हणून इम्रानचा शोध त्याचे मामा आरिफ शेख अब्दुल गफ्फार व इम्रानचे वडील अकिल खान हे सुध्दा पावणे चार वाजेच्या सुमारास शिवाजी उद्यानात पोहचले.

या उद्यानातील पडक्या विहिरीजवळ इम्रान हा उभा होता. मामा आरीफ शेख यांनी काही अंतरावरुन इम्रानला आवाज दिला. मात्र इम्रानने ऐकले नाही. दोघेही इम्रानपर्यंत पोहचतील तोपर्यंत इम्रानने विहिरीत उडी घेतली होती. एकुलत्या एक मुलगा डोळ्यादेखत इम्रानने उडी घेतल्याने इम्रानचे वडील व मामा या दोेघांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

तासाभरानंतर मृतदेह सापडला

अर्धातासानंतर ही घटना वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे घटनास्थळी परिसरासह इतर ठिकाणच्या तरुणांसह नागरिकांची एकच गर्दी झाली. दरम्यान घटनेबाबत पत्रकार जकी अहमद याने एमआयडीसी पोलीस तसेच अग्निशमन विभागाला कळविले. त्यानंतर काही वेळातच बंबही मदतीसाठी पोहचला. तरुणाचा मृतदेह शोधण्यास अडचणी येत होत्या अमीर शेख, फरीत मुलतानी, शेख रफी शेख इस्माईल, अजिज खान, रेहान रिक्षावाला, शाहरुख शेख रफीक या पट्टीच्या पोहणार्‍या तरुणांनी विहिरीत उड्या घेत इम्रानचा शोध सुरु केला.

तब्बल तासाभरानंतर पट्टीचे पोहणारे तरुण व अग्निशमन विभागाचे शशीकांत बारी, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, भगवान पाटील, सरदार पाटील, हिरामण बावस्कयांच्या प्रयत्नांना यश आले व पाच वाजून 20 मिनिटांनी मृतदेह सापडला. तातडीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याल मृत घोषित केले. मयत इम्रान याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

आजारांनी संपूर्ण कुटुंबाला घेरले

मेहरुण परिसरातील अशोक किराणा येथे इम्रान हा आई सुगराबी, वडील, आकिल खान, पत्नी हिना या कुटुंबासह राहत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. एमआयडीसी परिसरातील कपाट बनविण्याच्या फॅक्टरीत वडीलांसोबत, इम्रानही काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. इम्रानची आई सुगरा बी या नेहमी आजारी तर काही दिवसांपूर्वी इम्रान याचे वडील आकिल खान याचेही कॅन्सरचे ऑपरेशन झाले. या ताणतणावात असतांना इम्रान हा स्वतः डोक्याच्या मायग्रेन या आजाराने त्रस्त होता. स्वतः मायग्रेनमुळे त्याच्या ताणतणावात भर पडली होती. टेन्शन आले की, इम्रान मेहरुण तलावावर फिरायला निघून जायचा.

उद्यानातील विहिरीत ठरतेय सुसाईड पॉईंट

गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी उद्यानातील पडकी विहिर आहे. यापूर्वीही या विहिरीत अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र तरीही महापालिकेकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. संरक्षण भिंत अथवा विहिरीवर जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षापासून शिवाजी उद्यान ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या हालचाली सुरु आहे.

महापालिकेने उद्यान ताब्यातही घेतले आहेत. मात्र त्याच्या सुशोभीकरणाच्या मुहूर्त कधी गवसेल हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत. दरम्यान आता मेहरुण परिसरातील रहिवासी नगरसेवक तसेच महापौर असल्याने त्यांनी आतातरी या उद्यानाचे सुशोभीकरण करुन याठिकाणी उपाययोजना कराव्यातही अशीही अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.