जळगावच्या नंदिनीची योग स्पर्धेत गगनभरारी

जळगावच्या नंदिनीची योग स्पर्धेत गगनभरारी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिद्द, चिकाटी असली की कुठलीही गोष्ट अशक्य नसते हे अनेक उदाहरणातून सिद्ध देखील झाले आहे.

नारळ विक्रेत्याच्या मुलीने वयाच्या पाचव्या वर्षापासून आपल्या जिद्दीच्या जोरावर केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थीनी नंदिनी नितीन दुसाने हीने तब्बल 5 वेळा जिल्हास्तरीय, पाच वेळा स्टेट तर दोन वेळा नॅशनल स्पर्धेपर्यंत मजल मारुन आपल्या वडीलांसह जिल्ह्याचे नाव तिने रोशन केले आहे.

आता ही बारा वर्षाची नंदिनी दिवसातून तीन ते चार तास दररोज प्रॅक्टीस करुन ऑलॅपिकसाठी तयारी करीत असल्याचे तीने सांगितले.

शहरातील गोलाणी मार्केटजवळी हनुमान मंदिराजवळ नितीन भिका दुसाने हे नारळ विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांना आदित्य व नंदिनी अशी दोन मुले असून दोघही केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे.

नंदिनी पाच वर्षांची असतांना ती आपल्या मोठ्या भावासोबत योग शिक्षिका अनिता पाटील यांच्याकडे क्लासला जात असल्याने तीला देखील योगासने करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षापासून नंदिनी ही अनिता पाटील यांच्याकडे योगाचे धडे गिरवित आहे.

सकाळी उठल्यानंतर योगासने, सुर्यनमस्कार यासह विविध आसने करुन तिच्या दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर सायंकाळी दोन तास नियमीत योगाचे क्लास होत असल्याने याठिकाणी विविध आसनांच्या माध्यमातून ते प्रशिक्षण घेत असल्याचे 12 वर्षाच्या बालिका नंदिनी हीने सांगितले.

पायांच्या बोटांवर धावते नंदिनी

आपल्या मोठ्या भावासोबत दिवसातून चार ते पाच तास योगाची नियमीत प्रॅक्टीस करीत असल्याने 12 वर्षाच्या शरित अत्यंत लवचिक झाले आहे. नंदिनी ही आपल्या पायांच्या बोटांवर उंच उडी, धावणे यासह उंचावरुन उडी देखील मारु शकते इतपत तिने आपल्या शरिर लवचिक तयार केले असल्याने ते सर्वांना अचंबित करणारे आहे.

...अन् वयामुळे हुकले सुवर्णपदक

नंदिनी हिला योग प्रशिक्षक अनिता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. केंद्रीय विद्यालयांतर्गत घेतल्या जाणार्‍या क्लस्टर स्पर्धेसाठी नंदिनी हीची 8 व्या वर्षी निवड झाली. या स्पर्धेत नंदिनीने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदाची मानकरी ठरली. परंतु या स्पर्धेसाठी वयवर्ष 11 पुर्ण लागत असल्याने पंचांकडून तीला स्पर्धेसाठी बाद ठरविण्यात आले असल्याचे तीने सांगितले.

परिस्थिती हालाकिची मात्र जिद्द कायम

घरची परिस्थिती हालाकीची असतांना देखील जिद्दीच्या जोरावर नंदिनी ही योगाचे धडे गिरवित आहे. योग प्रशिक्षिका अनिता पाटील या देखील त्यांच्याकडून क्लासच्या फि ची अपेक्षा न ठेवता तिला नियमीत योगाचे प्रशिक्षण देत असतात. तसेच स्पर्धेच्या वेळी रात्री 11 पर्यंत तर सुट्टीच्या दिवशी संपुर्ण दिवस विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टीस करवुन घेत असल्याचे नंदिनीने सांगितले.

पुढचे स्वप्न आता ऑलम्पिकचे

नंदिनीने आतापर्यंत 5 वेळा जिल्हास्तरीय, 5 वेळा राज्यस्तरीय तर दोन वेळा नॅशनल स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत नंदिनीला गोल्ड, सिलव्हर तर नॅशनल स्पर्धेत तीने देशातून सातवा क्रमांक पटविला आहे.

तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नंदिनीने 2 राज्स्तरीय तर आता जानेवारीत झालेली नॅशनल स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला. आता पुढचे स्वप्न हे केवळ ऑलम्पिक असून ते पुर्ण करण्यासाठी आता नियमीत प्रॅक्टीस करीत आहे.

तसेच प्रॅक्टीसाठी तिला आई पूनम व आजी मंगला दुसाने यांचे मोठे पाठबळ असल्याचे तीने यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com