कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

 कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोनामुळे विधवा (Widowed by Corona) झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स (Task Force) व तालुका स्तरावर वात्सल्य समितीची स्थापना झाली. जळगाव जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू असून ह्याबाबत लोक संघर्ष मोर्चा व कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांसोबत जिल्ह्यातील 11 तालुक्यात वात्सल्य समितीबरोबर मीटिंग झाल्या आहेत. त्यावेळी आम्हाला मीटिंगमध्ये अनेक कायद्यात तरतूद असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही खूप संथ गतीने सुरू असल्यामुळे लोक संघर्ष मोर्चाच्या (Lok Sangharsh Morcha) माध्यमातून जिल्हाधिकारी तथा टास्क फोर्सचे जिल्हा अध्यक्ष अभिजित राऊत (Collector and District Chairman of the Task Force Abhijit Raut) यांची आज प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देण्यात आले.

सुप्रिम कोर्टात केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 50 हजार रुपयांबाबत ऑनलाईन अर्ज भरून सुध्दा अनेक महिलांचे नाव यादीत नाही तर काही महिलांचे पेंडींग दाखवले जात आहे तर काही महिलांचे नाकारण्यात आले आहे. हा सर्व घोळ दूर करत ज्या महिलांकडे आपल्या पती गमावल्याने व कोरोनामुळे गमावल्याने सर्टिफिकेट आहे त्यांना त्रुटी दूर करून 50हजाराचा लाभ देण्यात यावा, 18 वर्षा खालील पाल्यांना अद्याप बाल संगोपन योजना सुरू झाली नाही.

लातूरमध्ये मात्र पाल्यांना निधी मिळाला आहे. याबाबत पाल्यांची यादी जाहीर करून तात्काळ निधी वाटप करण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनामध्ये फॉर्म भरून अद्याप महिलांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कार्यवाहीचे आदेश द्यावेत, सर्व कोरोना एकल महिलांना रेशन बाबत प्राधान्य कुटुंब किंवा अंत्योदय मधील योजनेत समाविष्ट करा, महिलांना वारस दाखला मिळवून देण्याबाबत विधी व न्याय विभागाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

खाजगी शाळांनी फी माफीचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, उषा पुजारी, नलिनी देव, रोहिणी पाटील, राधा पाटील, शारदा पाटील, शिला सुरवाडे, सुनीता महिराडे, अनिता शिरसाठ, आशा खैरनार, वैशाली कोंढाळकर,सुप्रिया चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com