
धरणगाव - प्रतिनिधी Dharangaon
तालुक्यातील भाेद येथील रहिवाशी, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष, एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ निर्माण झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून त्यांनी तापीनदीत उडी घेतल्याचे समजते.
दोन दिवसांपासून त्यांची गाडी पुलावर बेवारस लागली होती. आज दुपारी 4 वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. उशिर झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. उद्या सकाळी ते बाहेर काढण्यात येतील. दरम्यान, राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध घेतला जात होता. मात्र, त्यांनीही तापीत उडी घेतल्याची चर्चा आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील(वय-54), पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-48), मुलगी म्यॉनल राजेंद्र पाटील (वय-21) हे तिघ जण टाटा इंडीका (एमएच-19/एपी-1094) गाडीने काल दि.17 रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे पितरांचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी 6 वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. मात्र, या कुटूंबाला कुणीही तापीत उडी घेतांना पाहिले नसल्यामुळे या गाडीकडे कुंणी गांभिर्याने पाहिले नाही. मात्र, आज (दि.18) मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक पुरूषाचा मृतदेह तापीत तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला आणि घटनेचे गांर्भीय वाढले. यानंतर समाजमाध्यमांमध्ये याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जळगाव जिल्ह्याचा क्रमांक असल्याने जळगावातील गृपमध्ये याबाबत चर्चा सुरू असतांना जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी ही गाडी ओळखल्यानंतर याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली. शेतकी संघाचे अध्यक्ष रमेशबापू पाटील यांनी भोद गावी धाव घेतली.
दरम्यान, याबाबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांना सायंकाळीच माहिती मिळाली. राजेंद्र पाटील पी.सी.आबांचे खंदे समर्थक होते. बातमी समजताच पी.सी.आबांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांची मुलगी म्यॉनल हिचाही मृतदेह तरंगतांना आढळून आला. मात्र, रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. सकाळीच हे मृतदेह नदीतून बाहेर काढणार असल्याचे पी.सी.आबा यांनी सांगितले.
बापलेकीचे मृतदेह दिसले असले तरी राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा काहीच पत्ता लागलेला नव्हता. भरवस येथून हे तिघ जण गाडीतून सोबतच भोद जाण्यासाठी निघाले होते. म्हणूनच सौ.वंदनाबाई यांनी सुध्दा तापीत उडी घेवून आत्महत्या केल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या कुटूंबाने आत्महत्या का केली असावी याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.
सच्चा कार्याकर्ता गमावला - पी.सी.आबा
राजेंद्र पाटील हे निस्वार्थी आणि सच्चा कार्यकर्ता होते. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. शेतकी संघांत संचालक व भाजपाचे तालुका उपाध्यक्षपद भुषवितांना या माणसाने सामान्य कार्याकर्त्यांशी असलेली आपली नाड तुटू दिली नाही. त्यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबासह पक्षाची न भरून निघणारी हानी झाली असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा हितचिंतक गेला - रमेशबापू
राजेंद्र पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आग्रही असायचे अतिशय कणखर व्यक्तीमत्वाचा धनी असलेल्या या माणसाने असा अताताईपणा का करावा हे न सुटणारे कोडे आहे. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांनी आपला हितचिंतक गमावल्याची भावना शेतकी संघाचे अध्यक्ष रमेशबापू पाटील यांनी व्यक्त केली.
आत्महत्येचे गुढ कायम
राजेंद्र पाटील यांच्या कुटूंबियांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. काल सासरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरू निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली? सधन असलेल्या या कुटूंबाला आर्थिक चणचण असण्याचे कारण नाही. शिवाय राजेंद्र पाटील हा अतिशय हिमतीचा माणूस होता. मग, त्यांनी पत्नी, मुलीसह आत्महत्या का केली असावी हीच चर्चा सुरू होती.
आज होणार अंत्यसंस्कार
राजेंद्र पाटील आणि त्यांची मुलगी म्यॉनल यांचा मृतदेह तापी तरंगत असली तरी रात्री उशिर झाल्यामुळे आज बुधवारी सकाळीच बाहेर काढली जाणार आहेत. शवविच्छेदनानंतर पार्थिव भोद येथे आणली जाणार आहेत. उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद नव्हती. या कुटूंबाने आत्महत्या करण्या आधी काही चिठ्ठी लिहिली आहे का? याबाबतही बुधवारीच खुलासा होणार आहे. यानंतर काही महिती मिळू शकते.