गुजरातच्या पावत्यांवरुन जळगावात वाळूची सर्रासपणे अवैध वाहतूक

कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव, जिल्हा महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
गुजरातच्या पावत्यांवरुन जळगावात वाळूची सर्रासपणे अवैध वाहतूक

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यातील एकही वाळूच्या ठेक्याचा लिलाव (Sand contract auction) झालेला नाही. मात्र तरी देखील नदीपात्रातून (river basin) मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा (Sand extraction) सुरु आहे. यातच सुरत (Surat) येथील वाळूच्या पावत्या (Sand receipts) दाखवून शहरातून वाळूची अवैध वाहतुक होत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री शनिपेठ पोलिस ठाण्याच्या (Shanipeth Police Station) कर्मचार्‍यांनी अवैध वाळूची वाहतुक करणार्‍या डंपरवरच्या कारवाई दरम्यान उघडकीस आला.

जिल्ह्यासह राज्यभरात अवैध वाळूची वाहतुकीचा विषय डोकेदुखीचा ठरत आहे. अवैध वाळू वाहतूकीमुळे जिल्ह्यासह राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी चांगलीच वाढलेली दिसून येत आहे. यातच जिल्ह्यातील वाळू गटांचे लिलाव काढण्यात आले होते. मात्र वाळू व्यवसायीकांकडून त्याकडे पाठ फिरविली जात असल्याने एकही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही. मात्र तरी देखील नदीपात्रातून दिवसासह रात्री मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबीचे पथकातील कर्मचारी परिस जाधव, मुकूंद गंगावणे, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, विजय निकम, किरण वानखेडे हे रात्रीच्या गस्तीवर असतांना कालिंका माता मंदिराजवळून अवैध वाळूची वाहतुक करणार्‍या डंपरला पोलिसांनी अडविले.

अन् डंपरचालकाकडे

आढळल्या सुरतच्या पावत्या

अवैध वाळू वाहतुक करणार्‍या डंपरचा शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पाठलाग केला. यावेळी डंपर भरधाव वेगाने असल्याने चालकाने ते हॉटेल कमल पॅराडाईजच्या बाजूने जात असतांना पोलिसानी त्याला अडवित त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे गुजरातमधील सुरतच्या वाळूच्या पावत्या आढळून आल्या आहे.जिल्ह्यातील एकाही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही. मात्र तरी देखील बांधकामांना त्यांच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात वाळ उपलब्ध करुन दिली जात आहे. परंतु पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी वाळूमाफियांकडून वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात असल्याचे अनेकद ा वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून उघडकीस आले आहे.

दरम्यान, सुरत येथील वाळू गटाच्या पावत्या जळगावात दाखवून वाळूची चोरटी वाहतुक करण्याचा नीवन फंडा आता वाळू व्यवसायीक अजमावत असल्याचे गुरुवारी पकडलेल्या वाळूच्या डंपरच्या घटनेतून उघडकीस आले. शनिपेठ पोलिसांनी अवैध वाळूची वाहतुक करणारे डंपर पकडल्यानंतर ते शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर चालकाची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी डंपरमालकाने अनेक राजकीय पदाधिकारी व वाळू व्यवसायिकांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता. परंतु पोलिसांनी हा दबाव झुगारुन कारवाई करीत ते डंपर जप्त केले. त्याचा अहवाल तहसीलदारांकडे सुपुर्द केला असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com