सोनीनगरात रुग्णालय बांधण्याचा उपमहापौरांचा हट्ट का?

परिसरातील नागरिकांचा सवाल; तक्रार करुनही प्रशासनाकडून कार्यवाही नाहीच
सोनीनगरात रुग्णालय बांधण्याचा उपमहापौरांचा हट्ट का?
देशदूत न्यूज अपडेट

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 चा खुला भूखंड आहे. या जागेवर महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर केला. परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता ठराव मंजूर केल्याने नागरिकांनी रुग्णालय बांधण्यावर हरकत घेतली आहे. तसेच या परिसरात रुग्णालय बांधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न व पाठपुरावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच केल्याने त्याचा इतका हट्ट का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा उपमहापौरांवर आरोप

पिंप्राळा हुडको परिसरातील 3 एकर जागा मनपाची जागा पडून आहे. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या राहत्या परिसरातील मनपाच्या नावे असलेले खुली जागा पडून आहे. या जागेवर रुग्णालय न बांधता महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून रुग्णालय बांधण्याचे ठराव मंजूर करण्यात आला. हे सर्व उपमहापौर यांनीच घडवून आणले असल्याचा आरोपही नागरिकांनी केली.

पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस ही जागा स्थानिक राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम करणे, वयोवृद्ध यांच्यासाठी व बालकांना खेळण्यासाठी तसेच महिलांना विविध कार्यक्रम करण्यासाठी ही जागा सोडलेली असते. मात्र गेल्या महिन्याभरापासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे रुग्णालय बांधणार तर सोनी नगरलाच असा हट्टीपणा करीत आहे.वास्तविक पाहता पिंप्राळा परिसरातील वैकुंठधाम समोरील संत मीराबाई नगर परिसरातील डीपी प्लान नुसार आरक्षित जागा आहे.

निवेदनदेवूनही कार्यवाही नाही

याप्रकरणी परीसरातील नागरिकांची हरकत असून याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन व भाजपाचे नगरसेवकांना निवेदन दिले आहे. तरी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दखल घेत रुग्णालय इतरत्र भागात बांधावे, सोनी नगरच्या मोकळ्या जागेत बांधू नये अशी मागणी ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे, निलेश जोशी, जि.एस.शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दिपक पाटील, अजय पाटील यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.