सप्ताह घडामोडी : पोलीसच असुरक्षित तर सर्वसामान्यांचे काय?

सप्ताह घडामोडी : पोलीसच असुरक्षित तर सर्वसामान्यांचे काय?

शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. यात सराईत गुन्हेगार कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. अशाच सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे ज्या पोलिसांवर संपुर्ण कायदा व सुवस्थेची जबाबदारी आहे तेच पोलिस सराईत गुन्हेगारांपासून सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडणार हे सहाजीकच.

राज्यासह जिल्ह्यात दिवसागणिक गुन्हेगारीचा आलेख वाढताच राहिला आहे. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचे मिळणारे अभय यामुळेच गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरीत असल्याचे जिल्ह्यात घडलेल्या अनेक घटनांमधून समोर देखील आले आहे. ही वाढती गुन्हेगारीच पोलिसांच्या बोकांडी बसत आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आठवड्यात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. शहराच्या मध्यवर्ती भागातून लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांनी लांबविल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनांमुळे पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची चौकशी करीत होते.

गेंदालाल मिल परिसरातील घरफोडीतील सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ डबल याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने प्राणघातक हल्ला करीत जखमी केले. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण होवू लागले होते. तर त्या सराईत गुन्हेगाराची त्याच्या परिसरात दहशत वाढली होती.

मात्र पोलिसांनी तो सराईत गुन्हेगार डबलची तो राहत असलेल्या परिसरात धिंड काढीत त्याच्या नांग्या ठेचल्याने नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भिती कमी झाली हे निश्चित. परंतु वाढत्या गुन्हेगारीबरोबर पोलिसांनी अशा सराईत गुन्हेगारांची त्या भागातून धिंड काढल्यास गुन्हेगारांव नक्कीच वचक निर्माण होईल आणि पोलिसांसह सर्वसामान्य नागरिक देखील मोकळा श्वास घेवू शकतील यात तीळ मात्र शंका नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com