सप्ताह घडामोडी : प्लास्टीक मुक्तीचा ‘जळगाव पॅटर्न’ ठरावा

 सप्ताह घडामोडी : प्लास्टीक मुक्तीचा ‘जळगाव पॅटर्न’ ठरावा

जळगाव शहर प्लास्टीकमुक्त व्हावा या उद्देशाने मनपा आयुक्तांनी संकल्प केलेला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना देखील सुरु केलेल्या आहेत. मात्र यात सातत्य अपेक्षित असून, नव्याचे नऊ दिवस होवू नये, अशी अपेक्षा आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. याला प्रदूषणदेखील कारणीभूत आहे. पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी कमी वजनाच्या प्लास्टीक कॅरिबॅगवर बंदी आहे. मात्र, जळगाव शहरात सर्रासपणे त्याचा वापर होतांना दिसत आहे. त्यामुळे नव्यानेच रुजू झालेल्या महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी प्लास्टीक मुक्तीचा संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी शहरातील व्यावसायिक, विक्रेत्यांची बैठक घेवून, प्लास्टीक कॅरिबॅगचा वापर टाळावा. अशा सूचना दिल्या आहेत.

जळगाव शहर महानगरपालिका
जळगाव शहर महानगरपालिकाJalgaon Municipal Corporation

नव्हेतर त्यांनी प्लास्टीकचा वापर करणार्‍या विक्रेत्यांसह नागरिकांवरही दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. खरंतर, विक्रेते किंवा नागरिक प्लास्टीकचा वापर करत असल्यामुळे पर्यावरणाला धोका पोहचत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचाही धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात पर्यावरण संतुलित नसल्याने अवकाळी पाऊसाचाही फटका बसू लागला आहे. याचा परिणाम सर्वसमावेशक आहे.

जळगाव शहर, ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असे ब्रीद वाक्य आहे. मात्र, सद्यास्थितीला जळगाव शहराचे चित्र वेगळे आहे. रस्त्यांचा प्रश्न, स्वच्छतेची समस्या असल्यामुळे शहरात प्रदुषणाचे प्रमाणही वाढले आहे. यावर मात करता यावी यासाठी मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी जळगाव शहर प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प राज्यासाठी ‘जळगाव पॅटर्न’ ठरावा एवढीच अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com