सप्ताह घडामोडी : महापौरांची आश्वासक वर्षपूर्ती

सप्ताह घडामोडी : महापौरांची आश्वासक वर्षपूर्ती

जळगाव महानगरपालिकेत अडीच वर्ष भाजपची निर्विवाद सत्ता होती. मात्र, राजकीय घडामोडींच्या हालचालीनंतर बहुमतात असलेल्या भाजपच्या सत्तेला शिवसेनेने सुरुंग लावला. आणि शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन या महापौर पदी विराजमान झाल्यात. आज त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती होत आहे. वर्षपूर्तीचा लेखाजोखा लक्षात घेतला तर, त्या ‘लकी’ ठरल्या आहेत.

महापौर झाल्यानंतर काही दिवसातच जिल्हा बँकेतही बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळातच स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत दिल्लीत पुरस्कार मिळाला आहे. राज्यात ठाकरे सरकार असल्यामुळे विकास कामांच्या निधीचाही प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे त्यांची वर्षपूर्तीतील वाटचाल आश्वासक आहे.

जळगाव शहराच्या विकासाच्या अनुषंगाने विचार केलातर, खूप मोठा बॅकलॉग भरुन काढणे अपेक्षित आहे. खरंतर विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट आहे. परंतू, जळगावकरांच्या आशा अन् अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती करतीलही यात तिळमात्र शंका नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिकेला जवळपास 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून बर्‍याचअंशी विकासकामे सुरु झाली आहेत.

शिवाय, शहरातील रस्त्यांसाठी शासनाने 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात 42 कोटींना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यादेशदेखील दिला होता.

परंतू, जनहित याचिका दाखल झाल्यानंतर पुन्हा स्थगिती दिली गेली. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने सुधारित अहवाल देवून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले. त्यानुसार तांत्रिक मंजुरीनंतर नगरविकास विभागाने देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांचाही मार्ग आता, मोकळा झाला आहे. उर्वरीत 58 कोटींचा प्रश्न महापौर निकाली काढतील अशी अपेक्षा आहे.

शहरातील हरवलेला ‘विकास’ आता सापडला आहे. त्यामुळे येणार्‍या महासभेत जवळपास 300 कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आले आहेत. बहूधा, महापालिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळणे ही बाब, जळगावकरांसाठी अतिशय आनंददायी आहे. किंबहुना ऐतिहासिक महासभा ठरणार आहे. महापौर जयश्री महाजन यांनी सामाजिक हितदेखील जोपासले आहे. जळगावकरांच्या समस्यांचे निराकरण तात्काळ व्हावे यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ कार्यान्वित केले आहे. ही सेवा अर्थात सुविधा त्यांच्या कार्यकाळातील फार मोठी उपलब्धी आहे. असे म्हटले तर, वावगे ठरणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com