
शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला शहरातून सुमारे चार ते पाच दुचाकी चोरी होत असल्याचे प्रकार दररोज उघडकीस येत आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याने चोरटे याच पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या समोर दुचाकी लांबवित असल्याने शहरात दुचाकी चोरटे सुसाट म्हणणे वावगे ठरणार नाही.
सद्या वाहनांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने दुचाकींच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे नवीन दुचाकी घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय बनली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नवीन दुचाकीपेक्षा सेकंडहॅण्ड दुचाकी घेण्याकडे त्याचा अधिक कल आहे. त्यामुळे सेंकडहॅण्ड दुचाकी विक्री करणार्यांना देखील भाव चढला आहे. यातच शहरासह जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहे. बनावट चावीसह हॅण्डल लॉक तोडून चोरटे दुचाकी घेवून पसार होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट, फुले मार्केट याठिकाणी दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
यातच गेल्या काही दिवसात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरटे घरातून चावी घेवून दुचाकी लांबवित असल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहे. दुचाकी चोरल्यानंतर चोरटे ही दुचाकी ग्रामीण भागात कमी पैशांमध्ये विक्री करीत असल्याचे अनेक घटनांमधून उघउकीस आले आहे. कमी पैशात दुचाकी मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक चोरट्यांच्या जाळ्यात सहजपणे अडकतात.
तसेच चोरलेली दुचाकींची परजिल्ह्यात विक्री करणारे रॅकेट देखील सक्रिय आहे. दुचाकी लांबविल्यानंतर अवघ्या काही तासातच ही दुचाकीचा क्रमांक बदलावून ती परजिल्ह्यात नेत त्याची कमी किंमतीत विक्री करणार्यांची साखळीच असल्याचे अनेकदा पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी चोरट्यांविरुद्ध कठोर भुमिका घेवून त्यांचा बंदोबस्त करावा हीच सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिस प्रशासनाकडे माफक अपेक्षा आहे.