
जिल्ह्यात 15 नगर परिषदांच्या निवडणूका प्रस्तावित आहेत. या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी वैयक्तीक मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. लग्नसमारंभ, दारावर जाणे, वाढदिवसाचे कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरे करणे या सारख्या निमित्तांचा इच्छुक जनसंपर्कासाठी उपयोग करून घेत आहेत.
गत निवडणुकांपेक्षा यंदाच्या निवडणूका राजकीयदृष्टीने जरा वेगळ्या आहेत. कारण राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे राज्याचा पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वापरता येईल काय? असे मंथन तिनही पक्षातून होत आहे. मात्र काँग्रेस पक्षाने स्वबळाची लढण्याची तयारी केली असल्याने महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर सुरूंग लागतांना दिसत आहे.
या सर्व बाबींमुळे राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार मात्र संभ्रमात आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या भूमिका ठरेल तेव्हा ठरेल इच्छुक उमेदवार आत्तापासूनच वैयक्तीक भेटीगाठींवर भर देत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील सामाजिक परिस्थीतीची माहिती देखील गोळा केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात तसे बघता भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा प्रभावी आहेत. तसेच या दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची फळी देखिल मोठी आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपा विरूध्द शिवसेना असाच सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांचे गुळपीठ लक्षात घेता स्थानिक स्तरावर आघाड्या करून निवडणूका लढविल्या जाऊ शकतात. कारण स्थानिक आघाड्या ह्या नेहमीच सोयीची पळवाट ठरल्या आहे. पालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार हे वैयक्तीक आणि दैनंदिन जनसंपर्कावर अधिक भर देत आहेत.
तीन ते चार महिन्या आधीच वॉर्डाचा अभ्यास करून सामाजिक गणितांची जुळवाजुळव करून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. आता ही मोर्चेबांधणी कितपत यशस्वी ठरेल हे पालिका निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे !