
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाचा पारा चढताच पाणी टंचाईची परिस्थीती निर्माण झाली आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) मे महिन्याच्या आधीच टँकरद्वारे (tanker) पाणीपुरवठ्याला (Water supply) सुरूवात करण्यात आली आहे.
राज्यभरात जळगाव जिल्हा हॉट डिस्ट्रीक्ट म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जळगाव जिल्ह्याचे सरासरी तापमान हे 45 अंशापेक्षा अधिक राहते. यंदा पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. त्यासोबतच यंदा तापमानही सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे उन्हाचा फारसा तडाखा जाणवला नाही. एप्रिल महिन्यात मात्र उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे.
पारा वाढताच जिल्ह्यात टँकर सुरू
तापमानाचा पारा वाढताच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात जामनेर तालुक्यातील दोन गावात दोन टँकर, पारोळा येथे दोन, बोदवड आणि भडगाव येथे प्रत्येकी एक असे सहा टँकर सुरू करण्यात आले आहे. तसेच जामनेर तालुक्यात आठ, भुसावळ आणि भडगाव तालुक्यात प्रत्येकी एक आणि पारोळा तालुक्यात दोन विहीरींचे अधिग्रहण, तर जळगाव तालुक्यातील मौजे लोणवाडी बु. येथे एक आणि चाळीसगाव तालुक्यातील मौजे हातगाव भिल्ल वस्ती येथे एक अशा दोन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.
जळगावचे तापमान 41 अंशांवर
एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सोमवारी दि. 17 रोजी तापमान 41 अंश सेल्सीअस मोजले गेले. तर किमान तापमान 26.3 अंश आणि आर्द्रता 51.1 इतकी आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच मे हिटची अनुभूती जळगाववासियांना येत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहे.
जिल्ह्याचा टंचाई आराखडा अडीच कोटींचा
जळगाव जिल्ह्यासाठी संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला असून यात 319 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा योजनांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवरून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.