भरवस्तीत घुसून बिबट्याने बकरी केली फस्त

बेलव्हाळ येथील घटना, अकरा दिवसात दुसरी घटना, एक बकरी जखमी
भरवस्तीत घुसून बिबट्याने बकरी केली फस्त

सुनसगाव ता.भुसावळ वार्ताहर - Bhusawal

येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथे (Leopard) बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच एक बकरी (goat) फस्त करुन दुसऱ्या बकरीच्या नरड्याला बिबट्याचे दात लागले असून बकरी जखमी झाली आहे.

सततच्या होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे बेलव्हाळ नागरीक भयभीत झाले आहेत.याबाबत माहिती अशी की, बेलव्हाळ येथील वार्ड क्रमांक तीन मधील नविन पाण्याच्या टाकी जवळ विमलबाई प्रकाश मोरे ही आदिवासी महिला राहत असून या महिलेकडे बकऱ्या आहे. बकऱ्या चारुन ही महिला आपला उदरनिर्वाह चालवते. मात्र दि २२ जुलै चे रात्री ते दि.२३ जुलै चे पहाटे ४ वाजेच्या दरम्यान बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला करून एका बकरीला घरा शेजारी असलेल्या शेताच्या बांधावर नेऊन फस्त केले आहे.

बकरीच्या पोटाचा आणि मानेचा भाग खाल्लेला आहे. तर दुसऱ्या एका बकरीचा नरडा पकडलेला असून एक बकरी जखमी झाली आहे.

नुकतेच १२ जुलै रोजी सुनसगाव रस्त्यावरील युवराज मंगा नारखेडे यांच्या बैलावर (गोऱ्हा) बिबट्याने खळ्यात हल्ला केला होता. त्यावेळी या बैलाला जखमा झाल्या होत्या. आता या घटनेला ११ दिवस झाले असताना बिबट्याने पुन्हा बकऱ्यांवर हल्ला केला आहे, त्यामुळे बेलव्हाळ येथील शेतकरी भयभीत झाले आहेत.

या गावाला लागूनच शेती शिवार तसेच पुढे वाघुर नदीचे पात्र आहेत आणि या पात्राला लागून मोठमोठ्या कपारी आहेत या कपारीत ही जंगली श्वापदे राहत असल्याचे सांगितले जाते.

या परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाहणी करावी असे बोलले जात असून या परिसरात बिबट असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात मात्र या प्राण्यांपासून सुरक्षितता कशी बाळगावी या बाबत माहिती नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com